उरण ः वार्ताहर
उरण तालुक्यातील केगाव बाजारपूर गावात शुल्लक भांडणातून आत्महत्या केला असल्याचा प्रकार घडला आहे. केगाव बाजारपूर गावात राहणार्या दिलीप ठाकूर व त्याच्या नातेवाईकांनी सांडपाण्यावरून शेजारी राहणार्या अरविंद पाटील (43) यांना सतत अश्लील भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या कुटुंबियांचा छळ केल्याने अरविंद पाटील यांनी या छळाला कंटाळून माणकेश्वर येथील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अरविंद पाटील यांनी मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आपल्या मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकून आत्महत्या केल्याचे उघड झाले. या घटनेनंतर मोरा सागरी पोलिसांनी दिलीप ठाकूरसह त्याच्या 11 नातेवाईकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
अरविंद पाटील हे केगाव बाजारपूरमध्ये राहण्यास होते. त्यांनी घराच्या पाठीमागे सांडपाण्याचा निचरा व्हावा, यासाठी शोषखड्डा बनविला. ही जागा गावातील दिलीप ठाकूरने विकत घेतली. त्रास होत असल्याचे सांगून दिलीप अरविंद यांच्याशी वाद घालून सतत भांडण करत होता. त्यांच्या कुटुंबियांनाही शिवीगाळ करत होता. यातून अरविंद यांनी आत्महत्या केली. आरोपी दिलीप ठाकूर व त्याच्या नातेवाईकांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.