Breaking News

पनवेलकरांचे आठ तास विजेविना हाल!

पनवेल ः बातमीदार

पनवेल शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले नवे गॅस इन्सुलेटेड उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या उपकेंद्रामधून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणने प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी उपकेंद्राचे काम करण्यासाठी पनवेल शहरातील वीजग्राहकांना तब्बल आठ तास विजेविना काढावे लागले. त्यामुळे पनवेलकरांची प्रचंड गैरसोय झाली.

पनवेल शहराला अखंडित वीजपुरवठा मिळावा या उद्देशाने महावितरणच्या पनवेल उपविभागीय कार्यालयाच्या मागील बाजूला गॅस इन्सुलेटेड उपकेंद्र उभारण्यात आले आहे. पनवेल शहरातील 42 हजार वीजग्राहकांचा विचार करून गॅस इन्सुलेटेड उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील दोन वर्षांपासून उपकेंद्राचे काम सुरू असून आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. नोव्हेंबर 2018मध्ये सुरू झालेले काम काही कारणास्तव रेंगाळले होते. आता हे काम पूर्णत्वाकडे आले असून पनवेल शहरातील 42 हजार वीजग्राहकांना यामुळे दिलासा मिळणार असला तरी सध्या नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. या उपकेंद्राचे काम करण्यासाठी पनवेलचे सब एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर जयदीप नानोट यांनी प्रयत्न सुरू केले.

मंगळवारी सर्व वीजवाहिनी नव्या उपकेंद्रामधून सुरू करण्यासाठी वीज खंडित करण्यात आली होती. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेले हे काम सायंकाळी सात वाजेपर्यंतदेखील पूर्ण झाले नाही. नव्या उपकेंद्रावर वीजवाहिनी सुरू केल्यानंतर तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही वीजवाहिनी सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा जुन्या वीजवाहिनीवरून वीजपुरवठा सुरू करण्यास वेळ लागल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. मात्र दिवसभर वीज नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. जास्त वेळ बंद झाल्यामुळे जनरेटरदेखील बंद झाले होते. वीज नसल्यामुळे अनेक खासगी कार्यालये बंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे सरकारी कार्यालयात या प्रकारामुळे शुकशुकाट पहायला मिळाला.

पनवेल शहरातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी आम्ही नव्या उपकेंद्रावरून वीजवाहिनी सुरू करण्यासाठी शटडाऊन घेतला होता. तो सुरळीत करण्यास तांत्रिक अडसर निर्माण झाल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यास उशीर झाला. ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.

– जयदीप नानोटे, सब एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : हरेश साठे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार …

Leave a Reply