नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहीमने आगामी आयपीएल हंगामाच्या लिलावातून माघार घेणं पसंत केलं आहे. 19 डिसेंबर रोजी कोलकाता शहरात आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. नुकत्याच भारताविरुद्ध पार पडलेल्या मालिकेत मुश्फिकुरने चांगली कामगिरी केली होती. दौर्यात बांगलादेशला एकमेव सामन्यात यश मिळालं. दिल्ली टी-20 सामन्यात संघाच्या विजयातही मुश्फिकुरचा मोलाचा वाटा होता. कसोटी मालिकेतही मुश्फिकुरनेच बांगलादेशकडून एकाकी झुंज दिली होती, मात्र चांगल्या फॉर्मात असतानाही मुश्फिकुरने लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मुश्फिकुरने लिलावाच्या प्रक्रियेतून माघार घेतली असली तरीही मेहमद्दुल्ला, मेहदी हसन मिर्झा, मुस्तफिजूर रेहमान, सौम्या सरकार, तमिम इक्बाल आणि तस्कीन अहमद या खेळाडूंनी लिलावात सहभागी होण्याचं ठरवलं आहे.