पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील काळवली येथील एका मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 10) रात्री घडली. प्रतिक प्रमोद महाडिक (वय 14) असे या मुलाचे नाव आहे.
काळवली येथील प्रतिक महाडिक हा मुलगा घरात झोपला असता, गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्याला मण्यार सापाने दंश केला. पालक व नातेवाईकांनी त्याला पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले, मात्र या ठिकाणी डॉक्टर आणि योग्य उपचारसुविधा उपलब्ध नसल्याने प्रतिकला महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, सलग दुसर्या रात्री आणखी एक मण्यार सर्प प्रतिकच्या घरात आढळून आला. त्यालाही मारण्यात आले.
आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष
सध्या पोलादलूर येथील मेडिकल ऑफिसर अन्यत्र बदली करून गेले असून, केवळ आयुष सेवेतील डॉ. सलागरे आणि डॉ. राजेश शिंद सेवेत आहेत. यापैकी डॉ.शिंदे यांच्याकडे कोरोना संसर्गाचे नियोजन असून, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. भाग्यरेखा पाटील यांना महाड एमआयडीसीतील कोविड केअर सेंटरमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. परिणामी तालुक्यातील आरोग्यसेवेकडे सपशेल दूर्लक्ष होत असून, रुग्णांना जीवाला मुकावे लागत आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …