पाली : प्रतिनिधी
अंबा नदीतून पाली (ता. सुधागड) शहराला पाणी पुरवठा होतो. नदीतील पाणी साठून रहावे, यासाठी पाली ग्रामपंचायती मार्फत नदीमध्ये बांध घालण्यात आला आहे. मात्र वाळू माफियांनी हा बांध अक्षरशः तोडून टाकला आहे. परिणामी नदीचे पाणी कमालीचे घटले असून, पालीतील नागरिकांसमोर पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.
सुधागड तालुक्यातील बलाप गावाजवळ अंबा नदीचे पाणी अडविण्यासाठी पाली ग्रामपंचायतीने केटी बंधारा आहे. या बंधार्यामुळेच पालीतील नागरिकांना पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सद्यस्थितीत हा बंधारा पूर्णपणे मोडकळीस आला आहे. त्यामुळे कोलाड पाटबंधारे विभागाकडून नुकतेच तेथे फळ्या आणि पत्रे टाकले आहेत. ग्रामपंचायतीनेही खबरदारी घेत दोन-तीन दिवसांपूर्वी बांध उभारुन तात्पुरती उपयोजना केली आहे. मात्र त्यामुळे वाळू माफियांची कोंडी झाली. त्यांना येथून वाळू काढणे अवघड झाले. तसेच बांध घातल्याने बंधार्यातील पाणी पातळी वाढल्याने वाळू माफियांचे ट्रॅक्टर पुढे जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी हा बंधारा अक्षरशः तोडून टाकला आहे. परिणामी बंधार्यातील पाणी ओसरले असून, जॅकवेल जवळील पाणी पुरवठा करणारे दोन पंप उघडे पडले आहेत. त्यामुळे पालीमध्ये पाणी पुरवठा कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य अमित निंबाळकर यांनी सांगितले.
अंबा नदीपात्रात वाळू उत्खनन करणार्यांवर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. बंधारा तोडणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरदेखील कारवाई करण्याचा प्रयत्न आहे.
-दिलीप रायन्नावार, तहसीलदार,
पाली, ता. सुधागड