कर्जत : बातमीदार
नेरळजवळील ममदापुर येथील एका बांधकाम साईटवर महिला मजुराचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर बांधकाम साईटच्या ठेकेदाराने सदर मृतदेह कर्नाटक राज्यात गावी नेला. दरम्यान, या मृतदेहाचे शवविच्छेदन केले नसल्याने नेरळ पोलिसांनी ठेकेदारावर मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ममदापुर येथील ड्रीमज इन्फोटेक गार्डन व्ह्यू रेसिडेन्सी या इमारतीचे काम सुरू आहे. तेथील चौथ्या मजल्यावर असलेली साहित्य वाहून नेण्याची लिफ्ट अंगावर पडल्याने कविता अर्जुन पवार (वय 25) या महिला मजूराचा 27 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यावेळी अन्य दोन महिला मजूरदेखील जखमी झाल्या होत्या. या इमारतीचे बांधकाम करणारे ठेकेदार विजय राठोड याने मजुरांच्या सुरक्षेबाबत कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. त्यामुळे कविता पवार या महिला कामगाराला आपला जीव गमवावा लागला होता. मात्र आपला अपराध लपविण्यासाठी ठेकेदार राठोड याने मृत्यूमुखी पडलेल्या महिलेबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात कोणतीही माहिती दिली नाही. तसेच सदर मृतदेह नेरळ येथून बदलापूर आणि तेथून कर्नाटक राज्यात नेला आणि गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृत महिलेचा पती अर्जुन खेरू पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बांधकाम ठेकेदार विजय राठोड यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार म्हात्रे करीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी विजय राठोड याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.