Breaking News

आवास योजनेचे काम प्रकल्पग्रस्तांना द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धाकटा खांदा ग्रामस्थांचा ठिय्या

पनवेल : रामप्रहर वृत्त
खांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरात धाकटा खांदा गावालगत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत होत असलेल्या प्रकल्पात आश्वासन देऊनही कंत्राटदाराकडून काम दिले जात नसल्याने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी सोमवारी (दि. 23) आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रकल्पावर मोर्चा नेऊन त्या ठिकाणी ठिय्या दिला.
या आंदोलनात स्थानिक नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग ‘क’च्या सभापती नगरसेविका हेमलता म्हात्रे, माजी नगरसेवक गणपत म्हात्रे तसेच बाळकृष्ण म्हात्रे, राकेश म्हात्रे, प्रवीण पाटील, भास्कर भगत, रवींद्र डोंगरे, काना पाटील, किशोर म्हात्रे, भगवान म्हात्रे, गणेश म्हात्रे, शैलेश म्हात्रे, भरत म्हात्रे, नितेश म्हात्रे, सुजीत म्हात्रे, परशुराम डोंगरे, गुरूनाथ पाटील, गणपत पाटील, हरीभाऊ भगत, विलास पाटील, राजू म्हात्रे, गिरीश म्हात्रे, दीपक म्हात्रे, मयूर म्हात्रे, एकनाथ म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे, सतीश पाटील, विनोद भगत, बाळाराम म्हात्रे, वासुदेव म्हात्रे, उत्तम गायकर, मनोहर शंकर म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, रूपेश पाटील, विकी तांबडे, विशाल तांबडे, प्रकाश म्हात्रे, संजय भगत, प्रकाश म्हात्रे, प्रभाग अध्यक्ष गणेश म्हात्रे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धाकटा खांदा गावाच्या हद्दीत प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत व सिडकोमार्फत होत असलेल्या कामाचे मुख्य कंत्राट शापुरजी पालनजी या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम ज्या जमिनीवर होत आहे त्या सर्व जमिनी सिडकोने अत्यंत अल्प दरात स्थानिकांकडून संपादित केल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना किमान रोजगार मिळावा यासाठी कंपनीने प्रकल्पाच्या कामात स्थानिकांना विविध पद्धतीने सामावून घ्यावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. त्या अनुषंगाने फेब्रुवारी 2020मध्ये खांदा गावातील स्थानिकांनी शापुरजी पालनजी कंपनी प्रशासनासोबत बैठक घेतली व त्यादरम्यान बाजारभावाच्या तुलनेत कमी दरात दरपत्रकदेखील सादर केले होते, मात्र फेब्रुवारी महिन्यापासून प्रलंबित असलेल्या या चर्चेला अजून पूर्णविराम मिळत नसेल तसेच चर्चा सुरू असताना काम सुरू ठेवत स्थानिकांना डावलून मुंबईतील निकटच्या कंत्राटदाराला कामाची ऑर्डर देण्याचे कट-कारस्थान शापुरजी पालनजी कंपनी प्रशासन करीत असल्याने ते मुळीच खपवून घेतले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलनादरम्यान घेतला.
शापुरजी पालनजी कंपनीने निश्चितपणे आपले काम करावे. त्यास आमची काहीही हरकत नाही, परंतु त्यात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना समाविष्ट करून त्यांच्या योग्यतेची विविध कामे त्यांना मिळावी अशी मागणी करीत स्थानिक प्रकल्पग्रस्त जर आपल्या हक्काचे काम मागत असतील तर त्यात गैर काय आहे, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला तसेच शापुरजी पालनजी कंपनी पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने स्थानिकांचा आवाज दबवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही केला. कंपनीकडून जर स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटणार नसतील तसेच स्थानिकांच्या पदरात न्याय पडणार नसेल तर या ठिकाणी कंत्राटदाराला काम करू देणार नाही; मग आमच्यावर कायदेशीर कारवाई झाली तरी बेहत्तर, असा कडक इशारादेखील आमदार ठाकूर यांनी दिला.
अखेर परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मध्यस्थी करून आमदार प्रशांत ठाकूर, ग्रामस्थ आणि ठेकेदाराचे प्रतिनिधी यांची कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांना सध्या अर्धे काम देण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले असून, उरलेले एस. बी. कंपनीचे कामदेखील ग्रामस्थच करतील, असे सांगण्यात आले, पण यावर ठोस निर्णय दोन दिवसांत होणार असून, तो निर्णय जर सकारात्मक न होता ठेकेदाराच्या बाजूने झाला तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी या वेळी दिला.

जी कामे ग्रामस्थ करू शकतात तीच कामे ग्रामस्थ मागत आहेत तसेच सिडकोने घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यात स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी कामे मागितली व ती त्यांना मिळाली तर चुकीचे काहीच नाही.
-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, उत्तर रायगड भाजप

..तोपर्यंत आमचा लढा सुरू राहिल -मनोहर म्हात्रे
ठेकेदार पोलिसांना हाताशी धरून आमच्यावर खोट्या तक्रारी करू लागला आहे. एकीकडे आमिषे द्यायची, चर्चा सुरू ठेवायच्या आणि कामे मात्र परस्पर बाहेरील नागरिकांना द्यायची हे फसवणुकीचे काम आम्ही खपवून घेणार नाही. जोपर्यंत  ग्रामस्थांच्या बाजूने निर्णय होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहिल, असा इशारा पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि स्थानिक नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी या वेळी दिला.

Check Also

विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव महासभेत येणार

पनवेल : रामप्रहर वृत्तमहानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विरुपाक्ष सभागृहाजवळ असलेल्या अंतिम भूखंड क्रमांक १२२ वर उभारण्यात …

Leave a Reply