मुंबई : प्रतिनिधी
शोषित, पीडित आणि दुर्लक्षितांना जगण्याचे आत्मभान देणार्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे असणार्या चैत्यभूमीवर शुक्रवारी (दि. 6) हजारो भीमसैनिक दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीने या परिसराला जणू निळ्या सागराचे रूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळाले.
शिवाजी पार्क परिसर आणि विविध ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी गुरुवारपासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आंबेडकरी गायक, कलावंत भीमगीते गाऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करीत होते. कवितांमधूनही महामानवाला अभिवादन केले गेले.
भीमअनुयायी सहकुटुंब बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीत दाखल होणार असल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी केली होती. नागरिकांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या.