Breaking News

भारतीय महिला संघाची सलग दुसरी हार मालिकाही गमावली

गुवाहाटी : वृत्तसंस्था

दुसर्‍या ट्वेन्टी- 20 सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाला पाच गडी आणि पाच चेंडू राखून पराभूत केले. 112 धावांचे दिलेले माफक आव्हान इंग्लंडने केवळ पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताचा टी-20तील हा सलग सहावा पराभव आहे. पाहुण्या संघाने 112 धावांचे लक्ष्य 19.1 षटकांत पाच बाद 114 धावा करीत गाठले. सलामीची डॅनियल वॅटने 55 चेंडूंत सहा चौकारांसह सर्वाधिक नाबाद 64 धावा ठोकल्या. लॉरेन विनफिल्डने 29 धावांचे योगदान दिले. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणार्‍या इंग्लंडने भारतीय फलंदाजांना चांगलेच कोंडीत पकडले. कॅथरिन ब्रंटने 17 धावांत तीन आणि लिन्से स्मिथ हिने 11 धावा देत दोन गडी बाद केले. ब्रंटने काळजीवाहू कर्णधार स्मृती मानधना 12 आणि जेमिमा रॉड्रिग्ज (2) यांना लवकर बाद करीत भारताला बॅकफूटवर आणले. डावखुरी फिरकीपटू स्मिथने हर्लीन देओल (14) हिला बाद केले. अनुभवी मिताली राजने सर्वाधिक 20; तर दीप्ती शर्मा आणि विदर्भाची भारती फुलमाळी यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. इंग्लंडने सावध सुरुवात केली. फिरकीपटू राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद करीत भारताला काहीअंशी यश संपादन करून दिले होते. एकता बिश्तने नताली स्किवर (1)आणि कर्णधार हीथर नाइटला (2)बाद करताच इंग्लंडची स्थिती चार बाद 56 अशी झाली होती. वॅट-विनफिल्ड यांनी पाचव्या गड्यासाठी 47 धावांची भागीदारी केली. दीप्तीने विनफिल्डला बाद केले, पण वॅटने ब्रंटसोबत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply