पनवेल : बातमीदार माऊली संकुल या साईटमध्ये वन बीएचके रूम देतो, असे सांगून बांधकाम व्यावसायिकाने तब्ब्ल 20 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. खांदेश्वर पोलिसांनी माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे बिल्डर सज्जन सखारामजी मोरे, विलास संदीपान चव्हाण, राजेश चोपडे व ध्रुव रामचंद्र बोरकर या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संतोष परशुराम परब (42) हे बेलापूर येथे राहत असून ते स्वतःच्या रूमच्या शोधात असताना पनवेल रेल्वे स्टेशनच्या समोर लावण्यात आलेली जाहिरात पाहिली व ते माऊली बिल्डर्स आणि डेव्हलपर्सच्या सेक्टर 15 ए, नवीन पनवेल या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात गेले. माऊली बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे बिल्डर सज्जन सखारामजी मोरे, विलास संदिपान चव्हाण, राजेश चोपडे यांनी त्यांची सर्व्हे नंबर 21, बोनशेत गाव येथे माऊली संकुल या नावाने नवीन साइट सुरू असल्याचे सांगून त्या ठिकाणी 529 स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया असलेल्या वन बीएचके रूमची किंमत 12 लाख 34 हजार 800 रुपये इतकी सांगितली. त्यानंतर परब यांनी 6 लाख 50 हजार रुपये बांधकाम व्यावसायिकाला चेकने दिले. या वेळी बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम करण्याकरिता सर्व परवानग्या असल्याबाबत त्यांना सांगितले, तसेच लता अनिल परमेश्वरी (38) यांच्याकडून 3 लाख रुपये, आर. कार्तिककुमार (39) यांच्याकडून 6 लाख 50 हजार रुपये, रूपेश भिकाजी मटकर (36) यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये, सुनीलकुमार विजयकुमार सिंग यांच्याकडून 3 लाख रुपये घेतले आहेत. अशा पाच जणांकडून 20 लाख 50 हजार रुपये बिल्डरने घेतले. त्यानंतर बिल्डर विलास चव्हाण यांनी परब यांना खरेदीचा करारनामा नोटरी करून दिला, परंतु रूमचे रितसर रजिस्टर्ड अग्रीमेंट करून दिले नाही. त्यानंतर काही दिवसांनी बिल्डर विलास चव्हाण व सज्जन मोरे यांनी बिल्डिंगचे काम अर्धवट करून नंतर काम बंद केले. याबाबत त्यास वारंवार विचारणा केली असता त्याने वारंवार वेगवेगळी कारणे सांगून थोड्याच दिवसांत काम सुरू होईल, असे सांगून चालढकल केली असल्याचे परब यांचे म्हणणे आहे, परंतु बरेच दिवस झाले तरी काम सुरू झाले नाही म्हणून परब हे माऊली बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे भागीदार विलास चव्हाण व सज्जन मोरे यांना रूमचा ताबा द्या, अथवा ते शक्य नसेल तर पर्यायी रूम द्या किंवा आमची बुकिंग रक्कम आम्हाला परत द्या, असे बोलले, मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, सज्जन मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांचे ऑफिस बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Check Also
सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …