मुंबई : प्रतिनिधी
विश्वचषकात पाकिस्तानबरोबर खेळावेच लागेल, अशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भूमिका घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) विनंती नाकारली होती, पण बीसीसीआय शांत बसलेली नाही. आता विश्वचषकाला काही महिन्यांचा अवधी असला तरी आतापासून पाकिस्तानवर कशी बंदी आणता येईल, यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. बीसीसीआयची गुरुवारी (दि. 7) एक बैठक झाली. विश्वचषक स्पर्धेते पाकिस्तानवर कशी बंदी घालता येऊ शकते, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. याबाबत सरकारचा पाठिंबा कसा मिळतो आणि पुढे काय पावले उचलायला हवीत, यासंदर्भात चर्चा झाली. भारतीय क्रिकेट संघाला आगामी विश्वकप स्पर्धेदरम्यान 16 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. पुलवामा हल्ल्यानंतर उभय देशांदरम्यानच्या या लढतीवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटचे संचालन करीत असलेल्या प्रशासकांच्या समितीने अद्याप याबाबत कुठला निर्णय घेतलेला नसून, सरकारचे काय मत आहे, याची ते प्रतीक्षा करीत आहेत.
विश्वचषक स्पर्धेला अजूनही चार महिन्यांच्या अवधी आहे. त्यामुळे आमच्याकडे अजून बराच कालावधी आहे, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा काय करायचे हे आम्ही ठरवत आहोत. या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही देशांवर बंदी कशी आणता येऊ शकते, याबाबत आम्ही संयुक्त राष्ट्राचे दार ठोठावणार आहोत.
-विनोद राय, प्रमुख,
बीसीसीआय प्रशासकीय समिती