Breaking News

पनवेलचे पाऊल पडते पुढे

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पनवेल महापालिकेचे प्रगतीच्या दिशेने पाऊल पडत आहे, असेच अभिमानाने म्हणावे लागेल.कारण राज्यस्तरावर पनवेलला 25वा क्रमांक मिळाला आहे. यापुढेही आपल्याला अशीच प्रगती करावयाची आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करणे गरजेचे आहे.

कोकणातील मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून मोठ्या अभिमानाने पनवेल महानगरीकडे पाहिले जाते. या महानगराला मुंबईचे उपनगर म्हणूनही ओळखले जाते. अशा या महानगरीची प्रगतीकडे वेगाने पावले पडू लागल्याने भविष्यात पनवेल ही महानगरी स्मार्ट सिटी होण्यास विलंब लागणार नाही. पनवेल नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर खर्‍या अर्थाने विकासाचा वेग वाढू लागला आहे. पनवेलचे कर्तबगार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापौर डॉ. कविता चौतमोल, उपनगराध्यक्ष विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, सर्व मनपा सभापती, नगरसेवक यांचे अथक प्रयत्न विकासासाठी सुरू आहेत. त्यामुळे या महानगरीचा चेहरामोहरा दिवसेंदिवस बदलत चालला आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे, पण सध्या मनपाची जी काही वाटचाल सुरू आहे ती निश्चितच आश्वासक आहे हे आवर्जून नमूद करावे लागेल. कारण नुकत्याच जाहीर झालेल्या देशव्यापी स्वच्छता

सर्वेक्षण अभियानात पनवेल महापालिकेला राष्ट्रीय स्तरावर 86वा तर राज्यस्तरावर 25वा क्रमांक मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी मनपाचे मानांकन वधारले आहे. स्वच्छता सर्वेक्षणाकडे एक स्पर्धा म्हणून न पाहता कायमस्वरूपी महानगरी कचरा मुक्त करण्याबरोबच परिसर स्वच्छ कसा राहील याकडे मनपा पदाधिकारी आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी कंबर कसून प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी सर्वांनीत हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. कारण भविष्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण, नागरीकरण झपाट्याने वाढणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, सी लिंक आदी विविध प्रकल्प आता मार्गी लागले आहे. जेएनपीटीचा विस्तारही होऊ लागला आहे. रस्त्यांचा विकासही झपाट्याने होत आहे. अशा वेळी पनवेल हे मध्यवर्ती ठिकाण बनले आहे. विकासाचे, निवासाचे केंद्र म्हणून नोकरदार मंडळी पनवेलकडे पाहत आहेत. नैना प्रकल्पामुळे नागरीकरणही झपाट्याने होत आहे. अशा वेळी या महानगरात राहणार्‍या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे महापालिकेला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मनपावरील ताणही वाढणार आहे. त्यासाठी आतापासूनच जर मूलभूत आणि कायमस्वरूपी गरजांची पूर्तता करीत राहिले, तर भविष्यात या अडचणी कमी होऊन शहराचे आरोग्य वा सार्वजनिक व्यवस्था बिघडणार नाही. अर्थात विद्यमान पदाधिकारी त्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सहकार्य करणे गरजेचे आहे. पनवेल महानगरी ही आपली नगरी आहे या कर्तव्य भावनेने प्रत्येक नागरिकाने सहभागी होणे गरजेचे आहे.एखादे अभियान यशस्वी करायचे असेल, तर त्यासाठी राजकीय पक्षांसह नागरिकांचाही तितकाच सहभाग असणे आवश्यक वाटतो. पनवेलकर अशा उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आलेले आहेत आणि यापुढेही ते असेच सक्रिय राहतील.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply