Breaking News

332 खेळाडूंवर लागणार बोली

स्टेन, मॅक्सवेल, उथप्पा, मॅथ्यूजचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2020च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावासाठी एकूण 971 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून 332 खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या 332 खेळाडूंच्या नावाची यादी आठही संघांच्या व्यवस्थापनाकडे पाठवण्यात आली आहे. या लिलाव प्रक्रियेचे काम ह्यू एडमीड्स पाहणार आहेत.

सुरुवातीला असलेल्या 971 खेळाडूंच्या यादीत 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडू होते. त्यानंतर आता 332 खेळाडूंची नावे अंतिम करण्यात आली असून, त्यात टीम इंडियाकडून खेळलेले 19 खेळाडू आहेत. याशिवाय मूळ यादीत नसलेला वेस्ट इंडिजचा केसरिक विल्यम्स, बांगलादेशचा मुश्फिकूर रहीम, ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अ‍ॅडम झॅम्पा, इंग्लंडचा 21 वर्षीय विल जॅक्स यांसारख्या 24 नवोदित खेळाडूंची नावेदेखील अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

आयपीएल 2020ची लिलाव प्रक्रिया केवळ एक दिवस असणार आहे. या प्रक्रियेदरम्यान आठ संघांना आपला चमू पूर्ण करण्यासाठी एकूण 73 खेळाडू हवे आहेत. त्यापैकी 29 खेळाडू हे परदेशी असणार आहेत. अंतिम यादीत भारताचा रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट यांसारख्या खेळाडूंना समाविष्ट करून घेण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा धोकादायक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलदेखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. मानसिक ताणामुळे तो क्रिकेटपासून काही काळ दूर होता. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, जॉश हेजलवूड, मिचेल मार्श, आफ्रिकेचे डेल स्टेन, श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज यांची नावेदेखील अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply