Tuesday , February 7 2023

जागतिक मानांकनात स्वस्तिका घोषचा ‘षटकार’

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची टेबल टेनिसपटू सहाव्या क्रमांकावर

पनवेल : रामप्रहर वृत्त

राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने पुन्हा एकदा सुवर्णयश कामगिरी करीत ज्युनिअर गटातील जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे हा बहुमान मिळविणारी भारतातील ती पहिली टेबल टेनिसपटू ठरली आहे.

या सन्मानाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी गुरुवारी (दि. 12) स्वस्तिकाचे अभिनंदन केले. या वेळी नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर उपस्थित होते.  स्वस्तिका खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थी असून, विद्यालयाने तिच्या प्राविण्याला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.

81वी युटीटी ज्युनिअर अ‍ॅण्ड युथ नॅशनल टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच जम्मू काश्मिर येथे झाली. या स्पर्धेत स्वस्तिकाने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. यात कमालीची ताकद तिने दाखवून चमकदार कामगिरी करीत पदकांची लयलूट केली. 18 वर्षाखालील गटात बंगालच्या संघाला नमवून सुवर्णपदक, तसेच 21 वर्षाखालील युवा गटातही बंगालच्याच संघाला पराभूत करून सुवर्णपदक पटकाविले. 18 वर्षाखालील सांघिक गटात स्वस्तिकाला दिया चितळे, आदिती सिन्हा, प्रिता वार्तिका, तर 21 वर्षाखालील सांघिक गटात मनुश्री पाटील, अनन्य, सृष्टी हेलांगरी यांची मोलाची साथ लाभली. (पान 4 वर..)

विशेष म्हणजे या स्पर्धेत सलग दुसर्‍यांदा सुवर्णपदक पटकाविण्याचा बहुमान महाराष्ट्राने मिळविला. त्याचबरोबर 18 वर्षाखालील गटात खेळताना स्वस्तिकाने रौप्यपदक, तर दुहेरी गटात दिया चितळेच्या सोबतीने खेळत रौप्यपदक जिंकले. या संपूर्ण स्पर्धेत स्वस्तिकाने स्वतःच्या खांद्यावर राज्याची धुरा सांभाळून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

स्वस्तिकाने देश-परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धांमध्ये चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचविले आहे. हाँगकाँग, जॉर्डन, कोलंबो, ओमानसह इतर देशांमध्ये झालेल्या स्पर्धांत स्वस्तिकाने अजिंक्यपद पटकाविले आहे. स्वस्तिकाने लहानपणापासून टेबल टेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे. त्यामुळे तिला विराट कोहली फाऊंडेशनकडून स्कॉलरशिपही जाहीर झाली. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे, जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली. वडील संदीप घोष हे स्वस्तिकाचे प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत.

टेबल टेनिस श्रेणीतील ऑल इंडिया रँक एक प्राप्त झाली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक वर्षी तिने आपल्या खेळातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती दाखविली आहे. मागील महिन्यात ओमान येथे झालेल्या ओमान ओपन स्पर्धेत भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी जबाबदारीही स्वस्तिकाने बजावली. या स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले आणि पदक मिळविणारी भारताची एकमेव खेळाडू ठरली. स्वस्तिकाने एकूणच केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यामुळे तिने जागतिक मानांकनात हा सन्मान मिळविला आहे.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply