म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील कोंझरी गावानजीक सावित्री नदीपात्रात मासेमारी करणार्या एका युवकावर मगरीने हल्ला केल्याची घटना समोर आली असून, या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे.
फैजान मयनुद्दीन धनसे (वय 19, रा. पांगळोली) असे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मच्छीमार युवकाचे नाव आहे. फैजान व त्याचा मित्र मुझफ्फर धनसे हे दोघे 13 डिसेंबरला सायंकाळी सावित्री नदीलगत खाडीत मासेमारी करीत होते. त्या वेळी अचानक एका मगरीने फैजानवर हल्ला केला. यात त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला जखम झाली असून, तो सध्या मिरज येथे उपचार घेत आहे. या घटनेची नोंद म्हसळा वन विभागाच्या कोंझरी परिमंडळाचे वन अधिकारी बाळकृष्ण गोरनाक यांनी केली, तसेच घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला.
या भागातील खाडींचा भाग निमखार्या पाण्याचा असल्याने येथे मगरींना वास्तव्यासाठी पोषक वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरात मगरींची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन व फलक लावून जनजागृती करणार आहोत.
-निलेश पाटील,
परिक्षेत्र वन अधिकारी, म्हसळा