Breaking News

पोलादपुरात शाळकरी मुले भरदुपारी डांबरी रस्त्यावरून धावली अनवाणी, रायगड जि. प.च्या सेस फंडांतर्गत क्रीडा स्पर्धा

पोलादपूर : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेच्या सेस फंडांतर्गत केंद्रस्तरीय, बीटस्तरीय आणि तालुकास्तरीय क्रीडा

स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर मंगळवारी (दि. 17) भरदुपारी पोलादपूर केंद्रांतर्गत 14 प्राथमिक शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी चक्क बिनचपलेने तापलेल्या डांबरी रस्त्यावरून धावली. प्रत्येक तालुक्यासाठी एक क्रीडासंकुल उभारण्याचा शासन निर्णय होऊनही पोलादपूर तालुक्यात त्याची कोणतीही कार्यवाही न होता दरवर्षी केवळ लोकप्रतिनिधींकडून चर्चा, ग्वाही आणि आश्वासने दिली जातात, मात्र ही गैरसोय अद्याप दूर न झाल्याने कोवळ्या विद्यार्थ्यांना त्याची झळ सोसावी लागत आहे.

पोलादपूर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 100 मीटर व 200 मीटर धावणे आणि कबड्डी या खेळांचा समावेश आहे. पोलादपूर शहरातील पिंपळपारावरील मारुतीपासून श्रीगणेश मंदिरापर्यंत मंगळवारी दुपारी 3च्या सुमारास पायात चप्पल न घालता मुलांना धावण्यास सांगण्यात आले. या वेळी भरउन्हात धावणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पायाला रस्त्यावरील टोकदार खडी टोचत असूनही विजेतेपद-उपविजेतेपद मिळविण्यासाठी सर्वांनी ही स्पर्धा पूर्ण केली. जिल्हा परिषद, राज्य शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेबद्दल शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली, तर एका विद्यार्थिनीने पायाला चटके बसतात, खडी टोचते, तसेच काही मुले चक्कर येऊन पडतात म्हणून रस्त्यावर धावण्याऐवजी मैदानाची गरज असल्याचे आवर्जून सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply