अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठेत मंगळवारी (दि. 17) सकाळी
लक्ष्मीनारायण मंदिरात मूर्तींची विटंबना झाल्याची घटना घडली. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आणि घटनेचा निषेध म्हणून दिवसभर बाजारपेठ बंद ठेवली. या प्रकरणी भगवान महंतू (वय 39, मूळ रा. झारखंड) याच्याविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोयनाड गावात असलेल्या भैरवनाथ मंदिरात मंगळवारी सकाळी 10.30च्या सुमारास भगवान महंतू या माथेफिरू इसमाने प्रवेश करून देवाच्या वस्त्रांना आग लावली. त्यानंतर तो बाजूलाच असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात गेला. तेथे त्याने या देवांचीही वस्त्रे फाडून टाकली. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी भगवानला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले, मात्र पोलीस त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करू लागले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे पोयनाड ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी बंदचे आवाहन करून संपूर्ण बाजारपेठ बंद केली. या प्रकारामुळे पोयनाडमधील वातावरण तंग झाले होते. ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भगवान महंतू याच्याविरोधात पोयनाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेऊन दिरंगाई करणार्या पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले, तसेच परप्रांतीय भाडेकरूंचीही सखोल चौकशी करण्याची ग्वाही दिली. मूर्तींची विटंबना केल्याप्रकरणी आरोपी भगवान महंतू याच्याविरोधात भादंवि कलम 295 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार के. आर. भौड अधिक तपास करीत आहेत.