Tuesday , February 7 2023

सिडकोच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत 15 डिसेंबर या अंतिम मुदतीपर्यंत मोठ्या संख्येने विमानतळ प्रकल्प बाधितांनी बांधकाम निष्कासनासाठी आपले अर्ज सिडकोकडे स्वेच्छेने दाखल केले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी बहुतांशी अर्जदारांची बांधकामे सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली आहेत. पनवेल तालुक्यातील दहा गावांतील जमीन संपादित करून 1160 हेक्टर क्षेत्रावर सिडकोतर्फे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्यात येत आहे. या गावांतील प्रकल्पबाधितांकरिता सिडकोतर्फे विमानतळालगतच्या पुनर्वसन व पुन:स्थापना क्षेत्रात पुष्पक नोड् विकसित करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सिडकोतर्फे नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील प्रकल्पबाधितांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार प्रकल्पबाधितांनी 15 डिसेंबरपूर्वी आपली घरे निष्कासित केल्यास त्यांना 18 महिन्यांचे घरभाडे व बांधकाम खर्च म्हणून रु. 1000 प्रति चौ. फुट या आर्थिक लाभांव्यतिरिक्त रु. 500 प्रति चौ. फुट इतका प्रोत्साहन भत्ताही देऊन करण्यात आला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक प्रकल्पबाधित बांधकामधारकांनी आपली बांधकामे निष्कासित करण्यात यावीत याकरिता सिडकोकडे स्वेच्छेने अर्ज दाखल केले. यापैकी बहुतांशी बांधकामधारकांची बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. अर्ज केलेल्या बांधकामधारकांची बांधकामेही लवकरच निष्कासित करण्यात येतील. तसेच त्यांना उपरोक्त आर्थिक लाभही देय असणार आहेत. 15 डिसेंबरनंतर अर्ज करणार्‍यांना 500 रूपये प्रति चौ. फुट प्रोत्साहन भत्ता वगळता उर्वरित आर्थिक लाभ देय असणार आहेत. उर्वरित प्रकल्पबाधितांनीही आपली घरे लवकरात लवकर निष्कासित करून पुनर्वसन व पुन:स्थापना क्षेत्रात स्थलांतर करावे. असे आवाहन सिडकातर्फे करण्यात आले आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply