Breaking News

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

स्थानिक राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी

पनवेल ः प्रतिनिधी
भाजपचे नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांची जीवनाबरोबरची लढाई अखेर संपली. भोपी गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर बुधवारी (दि. 17) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी प्रेमा भोपी, मुलगा अभिषेक त्याचबरोबर इतर कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने खांदा वसाहतीवर शोककळा पसरली आहे. तसेच भाजपमध्ये व स्थानिक पातळीवरील राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या संजय भोपी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात संघर्ष केला. रियल इस्टेटमध्ये त्यांनी जम बसवला. युवा उद्योजक म्हणूनही ते पुढे आले. पनवेल नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी पदार्पण केले, पण त्यांना अपयश आले. त्यानंतर संजय भोपी यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना प्रभाग 15मध्ये पक्षाने उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. अत्यंत कमी कालावधीतच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या गुड बुकात भोपी यांनी जागा मिळवली होती. लागलीच त्यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर प्रभाग समिती ‘ब’चे सभापतिपदसुद्धा त्यांना देण्यात आले.
एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रभाग समिती सभापती असा त्यांचा प्रवास राहिला. संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सिटीझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुप या संस्थांत सक्रिय होते. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ते कायम धावून जात असत. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत तत्पर असलेले कार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती.
खांदा वसाहतीतील प्रश्न आणि समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ते कायम पाठपुरावा करीत. मितभाषी, संवेदनशील, प्रेमळ आणि मनमिळावू असे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. त्यांच्याकडे दांडगा जनसंपर्क व मोठा मित्रपरिवार होता. अजातशत्रू म्हणून त्यांची पनवेलच्या राजकारणात छाप होती.
कोरोनाच्या संकटकाळातही त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून प्रभावी काम करून गोरगरिबांना मदतीचा हात दिला. हे करीत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. संजय भोपी यांना उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी प्रकृतीत सुधारणा झाली, परंतु त्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः लक्ष घालून त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आजाराशी लढाई सुरू होती. अखेर बुधवारी या लढवय्या लोकप्रतिनिधीची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. कामोठे येथील जुई गावात संजय भोपी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक संजय भोपी यांनी नेहमीच राजकारणविरहित काम केले. सामाजिक कार्यातही त्यांचा उदंड सहभाग होता. एक सामान्य कार्यकर्ता ते उत्कृष्ट लोकप्रतिनिधी, समाजसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतःची चांगली प्रतिमा समाजात निर्माण केली. दांडगा जनसंपर्क, मोठा मित्रपरिवार, मितभाषी, संवेदनशील, प्रेमळ आणि मनमिळावू अशी त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. नगरसेवक संजय भोपी यांच्या निधनाने एक चांगला लोकप्रतिनिधी आणि सहकारी आम्ही गमावला आहे.
– लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

आज सकाळी माझे सहकारी मित्र तसेच पनवेल महानगरपालिकेचे मा. ’ब’ प्रभाग समिती सभापती आणि नगरसेवक संजय दिनकर भोपी यांच्या निधनाची बातमी समजताच खूप दुःख झाले. समाजासाठी दिवसरात्र मेहनत करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी कार्यरत राहणारे, कुठलीही जबाबदारी स्वतःचे काम समजून यशस्वी करण्यासाठी धडपडणारे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे, प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देणारे, सर्व वयोगटात मिसळून काम करणारे नेतृत्व म्हणजेच संजय भोपी सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंबीय, आप्तपरिवार आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची त्यांना शक्ती मिळो, अशी मी प्रार्थना करतो.   
 – प्रशांत ठाकूर, आमदार

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply