पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरात महिला तक्रारदाराची तक्रार महिला पोलिस अधिकार्यांच्या मार्फत नोंदवण्यात यावी. अशी मागणी महिला दक्षता समितीच्या सदस्य नगरसेविका सीता पाटील यांनी केली आहे. त्या अशयाचे पत्र नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना पाठवण्यात आले आहे.
पनवेल परिसरात महिलांच्या अनेक कौटुंबिक तक्रारी पोलीस ठाण्यात येतात. विशेष करून कौटुंबिक शारीरिक मानसिक छळ, लैंगिक अत्याचार, हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रारी करण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात जातात. वास्तविक पाहता पोलीस ठाण्याची पायरी चढायला आजही अनेक महिला धजावत नाहीत. त्यांच्या मनात एक प्रकारे भीती असते परिणामी अनेकदा अन्याय होऊनही पोलीस ठाण्यापर्यंत तक्रारी येत नाहीत. त्या न्यायापासून वंचित राहतात. त्याचबरोबर त्यांच्यावर होत असलेल्या अन्याला वाचा फुटत नाही. समोरच्यांना जरब बसत नाही. आजच्या घडीला पतीकडून होत असलेल्या शारीरिक-मानसिक अत्याचाराचे अनेक तक्रारी येत आहेत.
पोलीस ठाण्यात गेल्यानंतर संबंधित महिलांना कित्येकदा दाद मिळत नाही. त्या ठिकाणी बहुतेकदा ठाणे अंमलदार पुरुष अधिकारी असतात. त्यामुळे महिलांना आपल्या अडचणी समस्या त्याचबरोबर तक्रारी सविस्तर पणे मांडता येत येत नसल्याचे नगरसेविका सीता पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामध्ये अनेक अडचणी आणि गैरसोय निर्माण होतात. काही अधिकारी हा तुमचा घरचा आणि नवरा-बायकोमधील मॅटर आहे. तो घरी जाऊन सोडवा अन्यथा कोर्टाचा जा ठिकाणी येऊ नका अशा प्रकारचे उत्तर देत असल्याचे अनुभव येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. हे वास्तव असून पोलीस ठाणे हे प्रथम न्यायालय आहे. याठिकाणी तक्रारीसाठी येणार्या महिलांना योग्य पद्धतीने वागणूक देण्याची गरज आहे.
कौटुंबिक अन्याय अत्याचाराने अगोदरच त्या भेदरलेल्या असतात. पोलीस ठाण्यात अशा पद्धतीने उत्तर मिळत असतील तर संबधिताचा आत्मविश्वास कमी होतो. ज्या आशेने त्या पोलीस ठाण्यात येतात. त्यांच्या पदरी एक प्रकारे निराशाच येते असेही पाटील यांचे म्हणणे आहे. सर्वांनाच संबंधितांवर गुन्हा दाखल करायचा नसतो. सासरकडील मंडळी तसेच पतीला पोलिसांकडून समज मिळाली तरी अनेकदा फरक पडतो. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांमध्ये महिलांच्या तक्रारी महिला पोलीस अधिकारी किंवा हवालदार दर्जाच्या महिला कर्मचार्याकडून नोंदवण्यात याव्यात, अशी मागणी महिला दक्षता समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी केली आहे.