Breaking News

कोटीच्या कोटी उड्डाणे

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी का म्हटले जाते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आयपीएलच्या पुढील वर्षी होणार्‍या तेराव्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली आणि अनेक खेळाडू मालामाल झाले. यात देशी-विदेशी खेळाडूंनी आपली छाप उमटविली. त्यांच्यावर सरस कामगिरीची जबाबदारी असेल. आयपीएल या पाच अक्षरी शब्दात इतकी जादू आहे की एक तपानंतरही या स्पर्धेची क्रेझ कायम आहे किंबहुना यंदा कुणाला संधी मिळणार? कोण कुठल्या संघातून खेळणार? कोणत्या खेळाडूला जादा दाम मिळणार याबाबतची उत्सुकता दरवर्षी असते. यंदाही ती होतीच. अखेर तो क्षण जवळ आला आणि कोलकातामध्ये तीनशेहून अधिक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल्स, सनराइजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स अशा आठ फ्रेंचायजींनी बोली लावली. क्रिकेटविश्वात ज्या ऑस्ट्रेलियाने अनेक वर्षे गाजविले त्याच ‘कांगारूं’चा यंदा लिलाव प्रक्रियेत वरचष्मा दिसून आला. कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सवर 15 कोटी 50 लाखांची बोली लावत त्याला सर्वात महागडा खेळाडू बनण्याचा मान दिला. ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेलला दुसर्‍या क्रमांकाची किंमत मिळाली. किंग्स इलेव्हन पंजाबने मॅक्सवेलवर 10 कोटी 75 लाखांची बोली लावली. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिससाठी बंगळुरूने 10 कोटी रुपये मोजले. वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉटरेल आणि शिमरॉन हेटमायरला अनुक्रमे साडेआठ कोटी आणि पावणेआठ कोटी रुपये दाम देण्यात आले. कॉटरेलला पंजाबने, तर हेटमायरला दिल्लीने विकत घेतले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कुल्टर नाईलला मुंबई इंडियन्सने आठ कोटी रुपये देत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. लेग स्पिनर पियुष चावला हा भारताचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. चावलाला चेन्नई सुपर किंग्सने सहा कोटी 75 लाखांना आपल्या संघात घेतले. त्याखालोखाल सॅम करन (पाच कोटी 50 लाख)ने बाजी मारली. मुंबईचा युवा अष्टपैलू यशस्वी जैस्वाल आयपीएलच्या लिलावात करोडपती झाला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला दोन कोटी 40 लाखांची बोली लावली. 18 वर्ष पूर्ण न झालेल्या यशस्वीची विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली आहे. याच यशस्वीने एकेकाळी पाणीपुरी विकली आहे, तर चार वेळा दहावी नापास झालेल्या आणखी एका भारतीय युवा खेळाडूचे नशीब फळफळले. गोलंदाज आकाश सिंह याला राजस्थान संघाने खरेदी केले. त्याला 20 लाख रुपये इतकेच दाम मिळाले असले, तरी त्याची बोहनी झालीय. तरुण खेळाडूंना संधी मिळत असताना 48 वर्षीय प्रवीण तांबे याने ‘अभी तो मै जवान हू’ म्हणत आयपीएलमध्ये स्थान कायम राखले आहे. कोलकाताने त्याला 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात दाखल करून घेतले. आयपीएल ही उगवत्या तार्‍यांची स्पर्धा मानली जाते. म्हणूनच काही दिग्गज पण फॉर्म हरपलेल्या किंवा अपेक्षित कामगिरी साकारता न येऊ शकलेल्या खेळाडूंना कुणी वाली राहिलेला नाही. चांगले प्रदर्शन हाच निवडीचा अघोषित नियम-निकष आहे. त्यामुळे ज्यांना चांगले दाम मिळाले त्यांच्यावर आता दमदार खेळ करण्याची जबाबदारी आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply