Breaking News

गोव्याकडे जाण्यासाठी पनवेल-करमाळी रेल्वे सुरू

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई परिसराचा दिवसेंदिवस वाढता विकास लक्षात घेऊन गेल्या 50 वर्षांत रेल्वेसेवेमध्ये प्रवासी संघाच्या शिफारसीने प्रवासी अनेक लक्षणीय सुखकारक बदल अनुभवत आहेत. त्यानुसार 24 नोव्हेंबरपासून पनवेल-करमाळी ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे.

या रेल्वेसेवेचे आरक्षणही पनवेल रेल्वे स्थानकावर व ऑनलाइन पद्धतीनुसार सुरू झाले आहे. करमाळी स्थानकावरून करमाळी-पनवेल सुटणार्‍या या गाडीचा नंबर 01016 आहे. करमाळीहून ही गाडी दर शनिवारी सकाळी 11ः30 वा. सुटेल व त्याच दिवशी रात्री 11ः15 वा. पनवेल रेल्वे स्थानकावर येऊन पोहचेल. पनवेल रेल्वे स्थानकावरून पनवेल-करमाळी सुटणार्‍या गाडीचा नंबर 01015 असा आहे. पनवेलहून ही गाडी शनिवारी मध्यरात्री 11ः55 वा. सुटेल व रविवारी दुपारी 12ः30 वा. करमाळी रेल्वे स्थानकावर येऊन पोहचेल. या गाडीला चार जनरल बोग्या, 13 स्लीपर बोग्या, एक टू टायर, चार थ्री टायर अशा एकूण 22 बोग्या जोडण्यात आल्या आहेत. करमाळीहून म्हापसा-मडगाव या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी अनेक वाहने व प्रवासी बस सुविधा उपलब्ध असतात.

त्याचप्रमाणे पनवेल व नवी मुंबईवासीयांसाठी पनवेल-नागपूर कायमस्वरूपी रोज धावणारी रेल्वेसेवेची मागणी व कोकण प्रांतात राहणारे खान्देश, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या विभागामधील सर्व रहिवासी व चाकरमान्यांसाठी व शेगाव-गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी जाणार्‍या भक्तगणांसाठी मडगाव-अजनी-नागपूरपर्यंतची रेलसेवा, रोहा-रत्नागिरी, शिर्डी साईबाबांच्या देवदर्शनाला जाण्यासाठी जलद प्रवासी सेवांची मागणी पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या सदस्यांनी केली आहे. त्यानुसार या चारही रेलसेवांची भेट लवकरच नवीन वर्षात प्रवाशांना मिळण्याची अपेक्षा आहे.

पनवेल रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांच्या मागण्यांचा प्रवासी संघ पनवेल व पनवेल रेल्वे स्थानक स्थानिय सल्लागार समिती सदस्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे उपनगरीय प्लॅटफॉर्म क्र. 4वर प्रवाशांना चढणे-उतरणेसाठी नवीन बांधलेला जिना, उपनगरीय स्थानकावर नवीन शौचालय, प्लॅटफॉर्म क्र. 6 व 7वर सरकता जिना, प्लॅटफॉर्म क्र. 5वर अप्पर क्लास वेटिंग रूम चालू करण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म क्र. 4वरील जिना हा प्रवाशांनी चढण्यासाठी व प्लॅटफॉर्म क्र. 5वरील जिना उतरण्यासाठी वापरावा.

सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळेस महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग आदी व सर्वसामान्य प्रवाशांना गर्दी, चेंगराचेंगरी, महिलावर्गाला गुंडगिरी व छेडछाडीपासूनही सुरक्षितता मिळेल, असे आवाहन प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, सहकार्यवाह व मध्य रेल्वे उपनगरीय सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बापट, पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य यशवंत ठाकरे, डॉ. मनीष बेहेरे, प्रवीण धोंगडे, उपेंद्र मराठे, नितीन देशमुख यांनी केले. अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल, प्रवासी संघ पनवेल व पनवेल रेल्वे सल्लागार समितीच्या कमिटी मेंबरने रेल्वे प्रशासनाचे जाहीर आभार मानले आहेत.

पनवेल-करमाळी रेल्वेसेवेचा पनवेल-उरण-नवी मुंबई व रायगड जिल्ह्यामधील प्रवाशांनी डिसेंबरमध्ये नाताळचा आनंद लुटण्यासाठी व सुखकारक प्रवासासाठी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, जेणेकरून ही रेल्वेसेवा प्रवाशांसाठी पुढील काळात रेल्वे प्रशासनातर्फे कायमस्वरूपी उपलब्ध होऊ शकेल.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply