Breaking News

वणव्यांमुळे निसर्गसंपदा धोक्यात

खारघर डोंगरावर वारंवार आगीच्या घटना

हिरवाई नष्ट; पर्यावरणप्रेमींकडून संताप

पनवेल : बातमीदार

खारघर वसाहतीला लागून असलेल्या डोंगररांगा गेल्या काही दिवसांत लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. हजारो हेक्टर निसर्गसंपदा जळून खाक झाल्याने येथील पक्ष्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरवर्षी हिवाळा व उन्हाळ्यात आगी लागतात.  हिरवळीच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप होत आहे.

खारघर वसाहतीच्या पश्चिमेला डोंगररांगा आहेत. हजारो हेक्टर क्षेत्र असणारा या डोंगरातील निम्म्याहून अधिक परिसर वन विभागाच्या मालकीचा आहे, तर सिडको मंडळाचीही मालकी या डोंगररांगांवर आहे. या डोंगरांवर विकास करण्यास येणार्‍या तांत्रिक अडचणींमुळे येथील निसर्ग टिकवून ठेवणे हाच एकमेव पर्याय आहे, मात्र या डोंगरातून उत्पन्न नसल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे.

दरवर्षी या डोंगररांगांवर हिरवळ वाढावी व टिकावी यासाठी शेकडो हात पुढे आले आहेत. डोंगरात हिरवळ उभी करणे हीच मोहीम घेऊन सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी डोंगरात वृक्ष लागवड करणे आणि हिवाळा व उन्हाळ्यातही वृक्षांच्या संगोपनासाठी झटत आहेत.  डोंगरावर वृक्षांच्या संगोपनासाठी जलस्रोत करण्याच्या कामाला गती नाही. स्वत:च्या दुचाकी घेऊन व कधी खांद्यावर मोठे हंडे घेऊन पर्यावरणप्रेमी खारघरचे डोंगर हिरवळ होण्यासाठी मेहनत करीत आहेत.

लग्नाचा वाढदिवस, जन्मदिवस अशा निमित्ताने येथे वृक्षलागवड केली जाते, मात्र 27 नोव्हेंबर, 16 डिसेंबर आणि 18 डिसेंबर या तीन आगीच्या घटनांनी ही डोंगररांग जळून खाक झाली आहे. भारती विद्यापीठाच्या मागील बाजूकडील आणि ओवे कॅम्प येथील डोंगररांगांवरील निसर्गसंपदा नष्ट झाली आहे.

रहिवासी मिळून ओवे गावालगत डोंगररांगांवर हिरवळ उगवण्याचा प्रयत्न मागील तीन वर्षांपासून करीत आहोत. यंदाही 20 हजार विविध वृक्षांच्या बिजांचे बॉल टाकले आहेत.  डोंगररांगांवर आग लागण्याची घटना 16 तारखेला दुपारी घडल्यानंतर मीच अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाने तातडीने ही आग विझविली. आगीच्या नेमक्या घटना कोण करते त्यांना आतापर्यंत पकडणे शक्य झाले नाही, मात्र हे कृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

-धर्मेंद्र कर, पर्यावरणप्रेमी

आगीच्या घटना टाळण्यासाठी डोंगराच्या खालील बाजूस वाढलेले गवत कापले. यंदा आगीच्या घटना वरच्या बाजूकडून सुरू झाल्या. खालील बाजूस लागलेली आग विझविण्यासाठी पाणी नियंत्रणाच्या वेगळ्या जोडण्या तेथे केल्या आहेत. अजूनही गवत कापण्यासाठी पाच कटर यंत्रे काम करीत आहेत. पाच रक्षक नेमण्यात आले आहेत. वन विभाग नेहमीच उपद्रवी व्यक्तींना येथे येण्यास मज्जाव करतो. पर्यटनाच्या नावाखाली काही जण सिगारेट टाकतात आणि त्याच आगकाडीमुळे आगीच्या घटना घडल्याचे अनेकदा दिसते. प्रशासनाला नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे.

-ज्ञानेश्वर सोनावणे, वन संरक्षक, वन विभाग

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply