Breaking News

अवसरे येथे पुण्यस्मरण सोहळ्यात हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील दोन क्रांतिकारकांना 2 जानेवारी 1943 रोजी ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात वीरमरण आले होते. त्या हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या दोन हुतात्म्यांचा स्मृतिदिन कर्जत तालुक्यातील अवसरे येथे क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला. तीन दिवसीय पुण्यस्मरण सोहळ्यात त्यांना अभिवादन करण्यात आले. या दोन्ही हुतात्म्यांना मार्गशीर्ष वद्य एकादशीच्या दिवशी हौतात्म्य आले होते.

क्रांतिकारक राघो भगत मास्तर यांच्या गावी क्रांतिवीर भगत प्रतिष्ठानच्या माध्यमातून हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील आणि क्रांतिकारक भगत मास्तर तसेच सीताई भगत यांच्या स्मृतिदिनानिमित्त तीन दिवसीय पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 21 डिसेंबर ते 23 डिसेंबरदरम्यान आयोजित होणार्‍या पुण्यस्मरण सोहळ्यात रविवारी (दि. 22) हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा स्मृती दिन तिथीप्रमाणे साजरा करण्यात आला. या दोन्ही हुतात्म्यांना ज्या वेळी वीरमरण आले, त्या पहाटे सहा वाजून 10 मिनिटांनी या दोन्ही हुतात्म्यांच्या अवसरे येथे उभारलेल्या स्मृतिस्तंभावरील क्रांतिज्योत प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. या वेळी अवसरे, नेरळ, पोशिर परिसरातील असंख्य देशप्रेमी नागरिक उपस्थित होते. क्रांतिज्योत प्रज्वलित करण्यात आल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्या वेळी हभप नागो गवळी, शिवराम महाराज तुपे, भरत भगत यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. त्याआधी 21 डिसेंबर रोजी ज्ञानेश्वरी पारायणाने या तीन दिवसीय पुण्यस्मरण सोहळ्याला सुरुवात झाली. दुपारी शिवतेज मंडळ नारंगी, खोपोली यांनी भजन सादर केले. सायंकाळी श्रीधर महाराज निश्चिंदे यांचे प्रवचन आणि खांडस येथील ज्ञानाई महिला हरिपाठ मंडळाने हरिपाठ सादर केले, तर रात्री प्रतिइंदोरीकर महाराज म्हणून ओळख निर्माण करणारे समाज प्रबोधनकार खडके-संगमनेर महाराज यांचे हरिकीर्तन झाले. 22 डिसेंबरला प्रसाद बुवा पाटील यांच्या श्रीपती प्रासादिक भजन मंडळाने भजन सादर केले.सायंकाळी हरीचंद्र महाराज जाधव यांनी प्रचवन आणि वैजनाथ परिसराच्या वैष्णव एकादशी मंडळाने हरिपाठ सादर केला. सांजवेळी दीपोत्सव आणि रात्री महंत पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. सोमवारी (दि. 23) सकाळी भिवंडी येथील ज्ञानेश्वर महाराज पारधी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे, तसेच महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply