नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व ईशान्य फाऊंडेशन यांच्या सहकार्याने शुक्रवारी (दि. 20) पाले खुर्द, तालुका पनवेल येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ग्रामीण भागातील 316 नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.
यामध्ये 82 नागरिकांना मोतीबिंदूच्या तक्रारी दिसून आल्या, तसेच 168 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले असून 42 नागरिकांना पुढील तपासणीसाठी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये बोलाविण्यात आले आहे. आजही भारतामध्ये दुर्गम ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याचे आव्हान अधिक महत्त्वाचे आहे. याच जाणिवेतून दीपक फर्टिलायजर अॅण्ड पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या ईशान्य फाऊंडेशनच्या सहकार्याने व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या निष्णात नेत्रविकारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे नेत्रतपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते.
वयाची साठी ओलांडलेल्या व उच्च रक्तदाब आहे किंवा मधुमेह असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी करून घेतली पाहिजे. उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या व्याधींमुळे डोळ्यांचे काही विशिष्ट आजार उद्भवण्याची शक्यता असते. या आजारांवर त्वरित योग्य उपचार झाले नाहीत, तर अंधत्व येण्याची शक्यता असते, अशी माहिती लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटतर्फे
देण्यात आली.