Wednesday , February 8 2023
Breaking News

नवीन वर्षात रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना भेट!

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल रेल्वे स्थानक स्थानीय सल्लागार समितीची बैठक बुधवारी (दि. 18) पनवेल रेल्वे स्थानकावर कमिटीचे चेअरमन मिनाजी-डी. सी. एम (गुड्स) मुंबई, पनवेल रेल्वे स्थानक प्रमुख व कमिटीचे कार्यवाह नायर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 

सर्व रेल्वे विभागामधील रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्याच्या व अपघातमुक्त प्रवासी धोरणानुसार पनवेल रेल्वे स्थानकाजवळील पोदी गेट नं. 20 किमी 68/23-26 येथे नवीन पनवेलकडे जाण्यासाठी त्या ठिकाणी अंडरपास (बोगदा) बांधण्याचे कामसुद्धा प्रगतिपथावर आहे. दोन्ही बाजूकडील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होताच पोदीकडे जाणारा हा मार्ग लवकरच प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी खुला होईल. या बोगद्यात लाइटची व्यवस्था, पावसाळ्यात साचणारे पाणी तातडीने बाहेर फेकण्यासाठी पंपिंग स्टेशनचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर नवीन पनवेलकडे जाणार्‍या सद्यस्थितीतील सिडको पुलावरील वाहनांची कोंडी व गर्दी कमी होण्यास मदत होईल. या मार्गे टू, थ्री, फोर व्हीलर अशा छोट्या गाड्यांमधून नवीन पनवेलकडे जाणारा प्रवास सुखकारक, कमी श्रमाचा व सोयीस्करपणे होईल, असेही त्यांनी सांगितले.

पनवेल रेल्वे स्थानक आवारामधील मेन गेटसमोरील पूर्व-पश्चिमेकडील रस्त्याच्या दुरुस्ती कामाला लवकरच सुरुवात होईल. रिक्षा वाहतुकीचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासाठी आरटीओ, स्थानिक वाहतूक शाखा कार्यालयातर्फे लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल व प्रवाशांनासुद्धा दिलासा मिळेल. पनवेल रेल्वे स्थानकावरील लिफ्ट, सरकते जिने यांच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचनासुद्धा पनवेल रेल्वे स्थानक स्थानीय सल्लागार समितीतर्फे करण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानक क्र. 6 ते 7वरील प्रवाशांना ऊन पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने पूर्ण शेड बांधण्याचे कामही प्रगतिपथावर आहे.

पनवेल रेल्वे स्थानक क्र. 1 ते 4पर्यंतचा बोगदा स्थानक क्र. 5 ते  7पर्यंत वाढवून नवीन पनवेलपर्यंत खोदाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन्ही बाजूचे जिने (दिवा-रोहा साईड), नवीन पनवेलच्या बाजूकडील बुकिंग कार्यालय येथे अनाऊंसिंग सिस्टीम इत्यादी व्यवस्थित ऐकू येण्यासाठी व त्याची माहिती इलेक्ट्रिक मल्टीपल इंडिकेटरवर मिळण्यासाठीचे काम लवकरच सुरू होत आहे. पनवेल-सीएसएमटी हार्बर व पनवेल-ठाणे ट्रान्स हार्बर उपनगरीय दोन गाड्यांमधील वेळेचे अंतर कमी करण्याची मागणी प्रवासी संघातर्फे रेल्वे प्रशासनाच्या मीटिंगमध्ये केली असून लवकरच त्याचे परीक्षण होऊन पनवेल रेल्वे स्थानकामधून दररोज दोन ते तीन मिनिटांनी गाड्या सोडण्याची तयारी मध्य रेल्वेकडून होईल. पनवेल-अंधेरी रेलसेवा गोरेगावपर्यंत वाढविण्याचे संकेत लवकरच रेल्वे प्रशासनाकडून नवीन वर्षात मिळतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ होईल व प्रवास सुखकारक होईल. खांदा रेल्वे स्थानकाजवळील क्रॉसिंग नं. 16 किमी 66/1-2 येथील विभागाची संयुक्तिक पाहणी करून तेथे प्रवाशांच्या अपघाती सुरक्षिततेच्या दृष्टीने सबवे किंवा आरओबीचे नियोजन करण्याकरिता रेल्वे प्रशासनाकडून तत्त्वतः मान्यता मिळाली. रेल्वे हद्दीत भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाले, भटक्या कुत्र्यांपासून संरक्षणाच्या दृष्टीने रेल्वे पोलीस विभागाने त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

या बैठकीस प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, सहकार्यवाह व मध्य रेल्वे उपनगरीय सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बापट, पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य यशवंत ठाकरे, डॉ. मनीष बेहेरे, प्रवीण धोंगडे, नितीन देशमुख, उपेंद्र मराठे आदी उपस्थित होते.

प्रवासी संघ पनवेल व मध्य रेल्वे पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या पाठपुराव्यामुळे प्रवासी सुविधांची अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. लवकरच प्रवाशांकरिता प्रवासी सुविधांची नवीन वर्षाची पनवेलकरांना भेट रेल्वे प्रशासनाकडून मिळणार आहे.

-श्रीकांत बापट 

मध्य रेल्वे उपनगरीय सल्लागार समिती सदस्य व प्रवासी संघाचे कार्यवाह

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply