14 फेब्रुवारीपासून उपोषण करणार
नगर : प्रतिनिधी
राज्य सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून राज्यभरातूनही सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहेत. अशातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून येत्या 14 फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक व विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते, पण या निर्णयामुळे लहान मुले, तरुण व्यसनाधीन होऊ शकतात, महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार राज्य सरकारने केलेला दिसत नाही याची खंत वाटते. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणार्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक आहे.
गेल्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रातून वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना पाहता वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला नाही, तर आंदोलन करावेच लागेल या निर्णयावर आम्ही आलो आहोत. लवकरच राज्यातील विविध सामाजिक संघटनांच्या समविचारी कार्यकर्त्यांची एक बैठक राळेगणसिद्धी येथे घेण्यात येणार आहे. त्या वेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. सरकारने हा निर्णय तत्काळ रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे; अन्यथा मला 14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करावे लागेल, असा इशारा अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
आमच्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आमच्या साधू-संतांनी, राष्ट्रीय महापुरुषांनी अतोनात प्रयत्न करून संस्कृती जतन करून वाढविण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानामध्ये वाईन आली तर ही आमची संस्कृती धुळीला मिळेल आणि चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल. त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही. ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून उपोषण करीत आहे, असेही अण्णांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.