पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस प्रशासनाने संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागदेखील दक्ष झाला आहे. कोरोनाच्या संसर्गावर उपाययोजनांचा भडीमार सुरु असताना त्याचाच एक भाग म्हणून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक इशांत धनवटे, पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार, पोलीस कर्मचार्यांनी पळस्पे पोलीस चौकी अंतर्गत येणार्या सर्व गावांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्याचा धडाका सुरु केला आहे. या वेळी प्रत्येक गावातील सरपंचांची भेट घेत कोरोनाबाबत काय दक्षता घ्यायला हवी, याची माहिती दिली. अत्यावश्यक सेवा देणारे मेडिकल्स, किराणा स्टोअर्स, भाजी विक्रेते यांना योग्य अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक गावोगावी रिक्षाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.