Breaking News

मुंबई-मांडवा जलवाहतुकीच्या फेर्‍यांमध्ये वाढ

अलिबाग ः प्रतिनिधी

सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच उगवत्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने अलिबागकडे येण्यास सुरुवात झाली आहे. गेट वे येथून जलवाहतुकीने आरामदायी प्रवास करीत पर्यटक मांडवा बंदरात दाखल होत आहेत. मुंबईकडून अलिबागकडे जलवाहतुकीने येणार्‍या पर्यटकांची वाढती संख्या पाहून पुढील चार दिवस बोटींच्या फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत. दररोज साधारणपणे 20 अतिरिक्त फेर्‍या होणार आहेत.

अलिबाग, मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारे हे पर्यटकांसाठी आकर्षणाची ठिकाणे असल्याने अलिबागला पर्यटकांची पहिली पसंती आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला अलिबागमध्ये पर्यटक जलवाहतुकीने येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथून जलवाहतुकीने पर्यटक मांडवा बंदरात येऊन तेथून बसने अलिबागकडे रवाना होताहेत. जलवाहतुकीने पर्यटक भरभरून येत असल्याने अलिबागेत लाखोंच्या संख्येने पर्यटक येतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून रडतखडत वाहतूक कोंडीचा सामना करीत प्रवास करण्यापेक्षा जलवाहतुकीचा पर्याय हा अधिक सोयीचा आणि सुकर आहे. त्यामुळे पर्यटक जलप्रवासाला पहिली पसंती देताहेत. प्रवास करताना ’सिगल’ पक्ष्यांच्या विहाराचा आनंदही पर्यटक लुटत आहेत.

सार्वजनिक जलवाहतूक व्यवस्थेबरोबरच पर्यटक खासगी बोटीनेही मांडवा बंदरात येत आहेत. वयोवृद्ध, लहान बालके, विकलांग व्यक्तींसाठी बग्गीची सुविधा जेट्टीपासून बससेवेपर्यंत करण्यात आली आहे, तसेच मांडवा बंदरात मेरिटाइम बोर्डाच्या सुरक्षारक्षकांसोबत खासगी सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत.

गेट वे येथून येणार्‍या पर्यटकांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी सर्व तयारी मेरिटाइम बोर्डामार्फत करण्यात आली, अशी माहिती मांडवा बंदर निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली. नववर्षाच्या स्वागताला आलेले पर्यटक नववर्ष स्वागत करूनच निघणार असल्याने अलिबागेत पर्यटकांचा मेळावा भरलेला दिसत आहे.

रविवारी 12 ते 15 हजार पर्यटक मांडवा येथे दाखल झाले. पुढील तीन-चार दिवसांत आणखीन 60 ते 70 हजार पर्यटक मांडवा येथे जलमार्गे येतील, असा अंदाज आहे. त्यांचा प्रवास सुखकर आणि तितकाच सुरक्षित होईल यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गैरसोय

टाळण्यासाठी बोटींच्या जादा फेर्‍या सोडण्यात येत आहेत. -अनिल शिंदे, बंदर निरीक्षक, मांडवा

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply