Breaking News

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांचा आज आरबीआयसमोर ठिय्या

पनवेल ः प्रतिनिधी

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने कर्नाळा बँक प्रशासन व पदाधिकार्‍यांना ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने द्यावेत यासाठी शुक्रवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता प्रसिद्ध सनदी लेखापाल, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील रिझर्व्ह बँकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. या वेळी ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह समितीमधील पदाधिकारी, ठेवीदार या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

ठेवीदारांचे पैसे देण्यास कर्नाळा नागरी सहकारी बँक प्रशासन असमर्थ ठरल्याने ठेवीदार, खातेदार चिंतेत आहेत. त्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समिती सक्रियपणे कार्यरत आहे, मात्र कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ झोपेचे सोंग घेऊन बिनधास्त उत्तरांची टोलवाटोलवी करीत आहे. शेकडो ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची पुंजी कर्नाळा बँकेत गुंतवली. त्यामुळे ठेवीदारांना आपल्या कुटुंबाच्या आयुष्याची चिंता वाटू लागली आहे,  मात्र बँक फसवी उत्तरे देऊन ठेवीदारांची सातत्याने फसवणूक करीत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत यासाठी हे धरणे आंदोलन होणार आहे.

– कर्नाळा बँकेसमोरही बेमुदत उपोषण

पनवेल ः बँकेत वारंवार फेर्‍या मारून आणि निवेदने देऊनही स्वतःच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने अखेर कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या खातेदार अश्विनी गायकवाड, हरिदास बदाले व अनिता गायकवाड गुरुवारी (दि. 9) सकाळी 9 वाजल्यापासून कर्नाळा बँकेच्या पनवेल येथील मुख्य शाखेसमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. अश्विनी गायकवाड यांचे कर्नाळा बँकेत फिक्स डिपॉझिटच्या माध्यमातून एक लाख नऊ हजार रुपये, तर त्यांचे मामा हरिदास बदाले यांचे बचत खात्यात दोन लाख सहा हजार रुपये असे एकूण तीन लाख 15 हजार रुपये जमा आहेत.

अश्विनी यांचा 1 फेब्रुवारीला विवाह असल्याने त्यांनी लग्नाच्या पूर्व खरेदीसाठी बँकेकडे आपल्या पैशांची मागणी केली. यासाठी त्यांच्या वडिलांनी सप्टेंबर 2019 पासून बँकेत वारंवार फेर्‍या मारल्या, मात्र त्यांना अद्यापही त्यांचे पैसे मिळाले नाहीत. विशेष म्हणजे अश्विनी यांच्या फिक्स डिपॉझिटची मुदत पूर्ण झाली आहे.  ऐन मंगलकार्याच्या वेळीही बँक पैसे देत नाही म्हणून गायकवाड कुटुंबीयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  त्यामुळे आपल्या हक्काच्या पैशांसाठी अश्विनी गायकवाड त्यांचे मामा हरिदास बदाले व आई अनिता गायकवाड यांनी कर्नाळा बँकेसमोर बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी कर्नाळा बँकेचे चेअरमन विवेक पाटील, त्याचबरोबर मुख्यमंत्री, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पनवेल महानगरपालिका आयुक्त, तहसीलदार, शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही निवेदनाची प्रत दिली आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply