Breaking News

नववर्षात पाच विक्रमांवर विराटची नजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा कर्णधार विराट कोहली याच्यासाठी 2020 हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. या दशकात विराटने अनेक विक्रम केले आहेत. आता नव्या वर्षातदेखील असेच विक्रम विराट स्वत:च्या नावावर करू शकतो. विशेष म्हणजे विराट समोर असलेल्या विक्रमांपैकी अनेक विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.
वनडे करिअरमध्ये सर्वात वेगाने 12 हजार धावा करण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 309 सामन्यांतील 300 डावांत 12 हजार धावा केल्या होत्या. सध्या विराटने 242 सामन्यातील 233 डावात 11 हजार 609 धावा केल्या आहेत. विराट ज्या पद्धतीने सध्या खेळत आहे त्याचा विचार करता पुढील वर्षी सचिनचा हा विक्रम तो सहज मोडू शकले.
सचिनने वनडे करिअरमध्ये 160 डाव घरच्या मैदानावर खेळले आहेत. त्यापैकी 20 डावांत त्याने शतकी खेळी केली होती. जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने घरच्या मैदानावर इतकी शतके केली नाहीत. सचिनचा हा विक्रम विराटच्या नजरेसमोर आहे. विराटने 89 डावात घरच्या मैदानावर 19 वनडे शतके केली आहेत. फक्त दोन शतकी खेळी केल्यास विराट सचिनला मागे टाकेल.
वनडेमध्ये विराटच्या नावावर 242 सामन्यांत 43 शतकांची नोंद आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 49 शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मास्टर ब्लास्टर सचिनला मागे टाकण्यासाठी विराटला फक्त सात शतकांची गरज आहे. विराटची कामगिरी पाहता हे लक्ष्य फार लांब नाही.
कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधाराचा विक्रम विराटने स्वत:च्या नावावर केला आहे. विराटने 53 कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे आणि त्यापैकी 33 वेळा संघाला विजय मिळवून दिला आहे. विराटने आणखी आठ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केल्यास तो माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकेल. धोनीच्या नावावर सर्वाधिक 60 कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व करण्याचा विक्रम आहे. भारतीय संघ नव्या वर्षात न्यूझीलंड दौर्‍यावर जात असून, फेब्रुवारी महिन्यात कसोटी मालिका खेळणार आहे.
कसोटीमध्ये सर्वात वेगाने आठ हजार धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आहे. संगकाराने 91 सामन्यांतील 152 डावांत आठ हजार धावा केल्या होत्या. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर दुसर्‍या स्थानावर (96 सामन्यातील 154 डाव) आहे. विराटने 84 सामन्यांत सात हजार 202 धावा केल्या आहेत.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply