Breaking News

तलवारींचा खणखणाट; जुगलबंदी जोरात!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 28 नोव्हेंबर 2019 रोजी आले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया पार पडली. काँग्रेसचे नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात सर्वाधिक मोठ्या अशा विधिमंडळ भारतीय जनता पक्षाचे नेते या नात्याने विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर आता वर्ष सरता सरता 30 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र विकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तारसुद्धा झाला.  महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी कल्पनेपलिकडची समीकरणे

पहायला मिळाली.

30 वर्षांपूर्वी ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या समवेत हिंदुत्वाचा रेशमी/केशरी धागा हाती घेऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांची युती घडवून आणली आणि 1990, 1995, 1999, 2004, 2009 या महाराष्ट्र विधानसभेच्या, तसेच 1989पासून 2014 पर्यंतच्या लोकसभेच्या निवडणुका युती म्हणून लढविल्या. 2014 साली जरी 25 सप्टेंबर रोजी युती तोडण्याचे एकनाथराव खडसे यांनी घोषित केले होते, तरी 2014च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थिर ठेवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांना मातोश्रीवर पाठवले आणि शिवसेनेबरोबर सरकार पाच वर्षे सारेकाही सहन करून, संकटांशी सामना करीत चालविले. 28 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करून यापुढे सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती म्हणूनच लढवायच्या, असे निश्चित करण्यात आले. लोकसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून निवडणुका लढवल्यानंतर, तसेच महायुतीला जनादेश मिळूनही अखेर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी बनविली. 21 ऑक्टोबर 2019पासून 30 डिसेंबर 2019पर्यंतचा सर्व राजकीय घटनाक्रम राज्यातील नव्हे; तर देशासमोर आला आहे. 2014पासून 2019पर्यंत भारतीय जनता पक्ष शिवसेना-महायुती सरकार असतानाही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी कल्याण, पालघर आणि अन्य काही निवडणुका स्वतंत्र लढल्यानंतरही त्याचा सरकारवर कोणताही परिणाम झाला नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोडून द्या, पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये ’तलवारींचा खणखणाट आणि जुगलबंदी जोरात’ याचाच प्रयोग जणू सुरू झाला आहे, असे दिसून येते.

एका बाजूला महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांची दालने, बंगले आणि खातेवाटप यावरून वादावादी, ओढाताणी सुरू झाली आहे. त्यातच अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राज्यात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचली असल्याचे दिसून येते. मग या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांची धार चढली नाही तरच नवल. त्यात साथीला प्रवीण दरेकर यांची साथही देवेंद्र फडणवीस यांना मिळालीय. दरेकर यांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते या पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्यांनी आपल्या कामाचा आवाकाही वाढविला आहे. विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्याबरोबरच  पालघरपासून सावंतवाडीपर्यंत कामाचा झपाटा सुरू केलाय. या दोन्ही नेत्यांनी सुरुवातीलाच आपले लक्ष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवसेनेला केले आहे. मग अशावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आल्या नाही तरच नवल. महाभारत आणि रामायणाच्या, शिवरायांच्या काळापासून आपण राजकारणात शह-काटशहाचे, डाव-प्रतिडाव खेळण्याचे प्रसंग आपण ऐकत, पहात आलो आहोत. अलिकडच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी ज्या चाली खेळल्यात त्यात शिवसेनेवर शिवसेनेचेच छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडले. शिवसेनेवर शिवसेनेचेच नारायण राणे काँग्रेस पक्षाने सोडले. देवेंद्र फडणवीस हे सभागृहात सर्वाधिक संख्या असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावत असतानाच भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून एकेकाळचे शिवसेनेचेच प्रवीण दरेकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे करण्याचा डाव खेळला आहे. दरेकर आजवर सभागृहात सदस्य म्हणून पाहिले आहेत, पण आता विधान परिषद सभागृहात अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून त्यांचा सरकारवरचा हल्ला पहायला मिळू शकेल.

मागच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर एकेकाळी भारतीय जनता पक्षाचेच असलेले धनंजय मुंडे यांना शड्डू ठोकायला उभे केले होते तद्वतच भारतीय जनता पक्षाने प्रवीण दरेकर यांना सभागृहात संधी दिली आहे. 1990च्या दशकात भारतीय जनता पक्षाचे प्रेमकुमार शर्मा हे एक जबरदस्त नेते सक्रीय होत. छगन भुजबळ यांनी डिसेंबर 1991मध्ये शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि शिवसेनेचे संख्याबळ एकदम पंधराने खाली येताच गोपीनाथ मुंडे यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करावी, असे पत्र प्रेमकुमार शर्मा यांनी विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी यांना सुपूर्द केले होते.

आता यापुढे ’तलवारींचा खणखणाट आणि जुगलबंदी जोरात’ हेच पहायला आणि अनुभवायला मिळणार, हे निश्चित. प्रमोद महाजन यांनी संसदेत सांगितलेला किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी पालघरबरोबरच अन्यत्र तोच किस्सा पुन्हा एकदा ऐकविलाय ’सिंगल लार्जेस्ट पार्टी इज इन अपोझिशन अँड सिंगल पार्टी मेंबर इज अ गव्हर्नमेंट!’ 105 वाले देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आणि दोन सदस्य असलेले बच्चू कडू हे आहेत सरकार. त्या वेळी प्रमोद महाजन हे विरोधी पक्षात होते, तर मगोपचे रमाकांत खलप होते केंद्रात मंत्री. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेची किंबहुना शिवसैनिकांची दुखती नस दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तीन पक्षांच्या आघाडी सरकारच्या वाट्याला 13/15/16 अशी मंत्रिपदे आल्याने अनेक इच्छुकांनी शिवलेली जाकिटे तशीच पडून राहतात की काय? अशी परिस्थिती आहे. अनेक दिग्गज मंत्रिपदापासून ’वंचित’ राहिले आहेत. दोन्ही काँग्रेसच्या जवळ शिवसेनेला खेचून आणणारे शिल्पकार अखेर कोरडेच राहिल्याची चर्चा आहे. बरं, शिवसेनेचे दिवाकर रावते, रामदासभाई कदम मंत्रिमंडळात नाहीत आणि दोन्ही काँग्रेसचे दिग्गज उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असल्याने ते मुख्यमंत्र्यांना कितपत काम करू देतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशीष शेलार यांनी तर ठाकरे सरकार च्या विरोधात ’तलवारींचा खणखणाट’ सुरु केला असून, ’जुगलबंदी जोरात’ सुरू झाली आहे. पाहू या पुढे काय काय होतंय ते. लोकशाहीचा रथ समांतर रेषेत प्रगतीच्या दिशेने दौडत नेण्यासाठी फडणवीस आणि दरेकर यांच्या नवीन जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

-योगेश त्रिवेदी (मो. नं. : 9892935321)

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply