Breaking News

जंजिरा किल्ल्यास साडेचार लाख पर्यटकांची भेट

ऐतिहासिक वास्तू अथवा एखादे प्रसिद्ध धार्मिक स्थळ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पर्यटक अथवा धार्मिक लोकांचा वावर वाढल्याने तेथील स्थानिक लोकांना मोठा रोजगार प्राप्त होऊन तेथील आर्थिक सुबत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात असणार्‍या मुरूड तालुक्यात ऐतिहासिक सुप्रसिद्ध असा 350 वर्षांपूर्वी बांधलेल्या किल्ल्यामुळे स्थानिकांना चांगलाच फायदा मिळाला आहे. एका किल्ल्यामुळे दिवसाला लाखो रुपयाची उलाढाल होऊन वर्षाला करोडो रुपयांची उलाढाल फक्त पर्यटकांमुळे होत आहे. जंजिरा किल्ल्यामुळे शिडांच्या बोटी चालवणार्‍यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे, तर स्थानिक विक्रेते व अन्य व्यावसायिकांना मोठा फायदा होत आहे. एका पर्यटकाकडून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाला 11 रुपये लेव्ही प्राप्त झाल्याने बोर्डालासुद्धा  2019ला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मुरूड येथून राजपुरी येथे  ने-आण करणार्‍या ऑटो रिक्षा व मिनी विक्रम रिक्षा यांनासुद्धा मोठा फायदा झाला आहे. जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी चारचाकी वाहने आणली असता त्यांना आपली गाडी ठरावीक जागेत पार्क करावी लागते. हा ठेकासुद्धा स्थानिकांना मिळाला असल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न यातून प्राप्त झाले आहे. अवकाळी पाऊस व वादळ वार्‍यांचा परिणाम सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यास सोसावा लागला नाही. कारण समुद्रापासून जवळचे अंतर असल्याने जलवाहतूक करणे सुलभ जाते, परंतु सरलेल्या डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने सर्व घटकांना मोठा व्यवसाय प्राप्त होऊन आर्थिक फायदा झाल्याचे दिसून येते. मुरूड तालुक्यातील राजपुरी गावात असणारा सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास सन 2019 या वर्षात देश-विदेशातील सुमारे साडेचार लाख पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन हा किल्ला पाहिला आहे.चारही बाजूला समुद्र व मध्यभागी हा किल्ला असल्याने पर्यटकांना शिडांच्या होड्यांमधून प्रवास करून या किल्ल्यावर पोहचावे लागते. जंजिरा किल्ला 350 वर्षांपूर्वी बांधला असूनही पूर्वी जसा किल्ला आहे तसाच ताठ मानेने व दिमाखात किल्ला उभा आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूस समुद्राचे खारे पाणी असूनही या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव सर्व पर्यटकांचे मन वेधून घेतात. 22 एकर परिसरात व 22 बुरूज असलेला हा महाकाय किल्ला पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. किल्ल्यास दरवर्षी पर्यटक लाखोंच्या संख्येने भेट देतात.किल्ल्यात जाण्यासाठी जंजिरा पर्यटक सोसायटी संस्थेस महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून परवाना देण्यात आला आहे. संस्थेच्या 13 शिडांच्या बोटी असून यामधून पर्यटक ये-जा करतात. त्याचप्रमाणे खोरा बंदरातूनसुद्धा किल्ल्यात ने-आण केली जात असते.

याबाबत अधिक माहिती सांगताना जंजिरा पर्यटक सोसायटीचे व्यवस्थापक नाझ कादरी यांनी सांगितले की, जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी 61 रुपये आकारले जातात. पर्यटकांची संख्या वाढली तर आम्ही जादा बोटींची कुमक मागवतो, जेणेकरून पर्यटकांना ताटकळत उभे राहावयास लागू नये. शिडांच्या बोटीमधून पर्यटकांना किल्ल्यात नेले जाते. हवेवर पडद्याच्या साह्याने आमच्या बोटी किल्ल्यावर पोहचतात. शिडाच्या बोटीतून प्रवास करावयास पर्यटकांना आवडते. किल्ला पाहण्यासाठी पर्यटक राजपुरी जेट्टीवर धडकतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. जेट्टीवर नारळ पाणी, सरबत, विविध टोप्या, गॉगल्स अशा विविध दुकानांमधून स्थानिकांचा लाखो रुपयांचा धंदा होतो. त्यामुळे या भागात क्रयशक्ती वाढली आहे.एका पर्यटकाच्या आगमनामुळे विविध घटकांना रोजगार मिळून येथे विकास झाला आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटक आल्याने महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डास लेवीच्या रूपात लाखोंचे उत्पन्न मिळते, तर पुरातत्त्व खात्याने तिकीट आकारणी सुरू केल्याने त्यांनाही मोठे उत्पन्न मिळत आहे. सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर दिवसागणिक पर्यटकांची संख्या वाढत आहे. यामुळे मुरूडचे महत्त्व वाढले आहे. जंजिरा किल्ल्यावर तरंगती जेट्टी झाली तर पर्यटकांना अगदी सहज चढता-उतरता येणार आहे. त्याचप्रमाणे अलिबाग-मुरूड येथील सूज रस्ते झाल्यास पर्यटन वाढीस प्रेरणा मिळेल. पूर्वजांच्या महान आणि अप्रतिम वास्तूमुळे मुरूड तालुक्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढत आहे. सलग सुट्यांत तर पर्यटकांच्या गाड्यांची मोठी रेलचेल दिसून येते. जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना जाण्यासाठी राजपुरी व खोरा बंदरातून उत्तम सुविधा करून देण्यात आली आहे. पर्यटकांसाठी दोन्ही बंदरांत मेरीटाइम बोर्डाकडून प्रतीक्षालय व बेंचेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. चांगली सेवा उपलब्ध करून देणे आमचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे यांनी केले.

-संजय करडे, खबरबात

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply