Breaking News

खातेवाटप झाले, आता काम करा!

राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर कुरबुरी सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपावर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा दिसून येतो. काँग्रेसची दुय्यम खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे, तर शिवसेनेसाठी हा घाट्याचा सौदा ठरला. खातेवाटप झाल्यानंतर आता सुव्यवस्थित कारभार करण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपाची प्रक्रिया अखेर पूर्णत्वास आली. याआधी मंत्रिमंडळ विस्ताराला झालेल्या विलंबामुळे सरकारवर टीका होत असतानाच तो उरकल्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारमध्ये सहभागी तिन्ही पक्षांमध्ये असंतोष उफाळून आला होता. अनेक आमदारांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्यामुळे खातेवाटपही लांबले होते. सरकार स्थापन होऊन एवढे दिवस होऊन गेल्यानंतरही मंत्र्यांना खाती मिळाली नसल्याने राज्याच्या विकासाला खीळ बसून एकूणच कारभार ठप्प झाला होता. वास्तविक राणा भीमदेवी थाटात मोठमोठ्या घोषणा करून सत्तेवर आलेल्या सरकारकडून राज्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र सुरुवातीला या सरकारने पुरता भ्रमनिरास केला. मलईदार खात्यांवरून खातेवाटपाला झालेला उशीर नव्या सरकारचा स्वार्थीपणा उघड करणारा ठरला. परिणामी जनतेचा भ्रमनिरास होऊन या सरकारविषयी नागरिकांत चीड निर्माण झाली आहे. अखेर गेले सहा दिवस सुरू असलेल्या घोळानंतर खातेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली. या खातेवाटपात एक गोष्ट ठळकपणे दिसून येते ती म्हणजे राष्ट्रवादीने वजनदार खाती आपल्या पारड्यात वळविण्यात यश मिळविले आहे. ग्रामीण भागाशी संबंधित महत्त्वाचे खाते मिळावे यासाठी अडून बसलेल्या काँग्रेसची तीन दुय्यम दर्जाच्या खात्यांवर बोळवण करण्यात आली. महत्त्वाचे गृहखाते राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आले असून, आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण खाते मागून घेतले. सर्व महत्त्वाची खाती आल्याने सरकारवर राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहणार आहे. अर्थ आणि गृह ही दोन प्रमुख खाती राष्ट्रवादीकडे गेली आहेत. आधीच्या खातेवाटपात गृहखाते शिवसेनेकडे होते. ग्रामीण जनतेशी निगडित असणारे ग्रामविकास खातेही राष्ट्रवादीकडे गेले. अर्थात राष्ट्रवादीत धक्कातंत्र अवलंबून काही बड्या नेत्यांना दुसर्‍या फळीतील नेत्यांपेक्षा कमी दर्जाची खाती देण्यात आली आहेत. काँग्रेसची तर दुय्यम दर्जाच्या खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे. सहकार, ग्रामीण विकास, कृषी किंवा पाणीपुरवठा यापैकी एक खाते मिळावे, अशी काँग्रेसची मागणी होती, मात्र बंदरे आणि खार जमीन, क्रीडा आणि युवक कल्याण आणि सांस्कृतिक कार्य ही तीन खाती काँग्रेससाठी सोडण्यात आली. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिल्यानंतर खातेवाटपात त्यांना काही विशेष मिळाले नाही. शिवसेनेला आता अशीच तडजोड करावी लागणार आहे. दरम्यान, मनासारखे खाते मिळाले नसल्याने काही मंत्र्यांनी नाराजीची भावनाही आपापल्या नेतृत्वाकडे व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ही नाराजी कशी दूर होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आता नव्या सरकारला समाधानकारक काम करून दाखवावे लागणार आहे. नव्याची नवलाई संपली असून, खरी कसोटी आता सुरू होणार आहे.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply