Breaking News

आरोग्य विभाग होणार सक्षम

कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती; उत्तम आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागात सुरुवातीपासून कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. काही महिन्यांपूर्वी कर्मचारी भरती करण्यात आली होती, मात्र अजूनही कमी मनुष्यबळावर आरोग्य विभागाचा कारभार हाकला जातो. महापालिकेच्या प्रयत्नाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचार्‍यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात महापालिकेचा आरोग्य विभाग सक्षम होण्याची शक्यता आहे.

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पनवेलमध्ये सहा ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र चालविले जातात. खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल शहरात दोन अशा सहा नागरी आरोग्य केंद्रांत केवळ 35 कंत्राटी नर्स कर्मचारी आहेत. ऑक्टोबर 2018 रोजी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पदभरतीच्या माध्यमातून ही भरती करण्यात आली होती. काही महिने स्थगित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतून केवळ 37 पदे भरण्यात आल्यामुळे आरोग्य विभागास अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी महापालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. सचिन जाधव यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी प्रयत्न सुरू केले होते. राज्याच्या आरोग्य विभागाने याची दखल घेतली असून पनवेल

महापालिकेसाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून कंत्राटी भरती केली जाणार आहे. ठाणे येथील उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई परिमंडळ या कार्यालयाच्या माध्यमातून भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात

आले आहेत.

परिचारिका म्हणजे नर्स पदासाठी 8 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करता येणार आहेत. कंत्राटी पद्धतीने काम करू इच्छिणार्‍या उमेदवारांनी अर्ज भरून थेट

मुलाखतीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये फार्मासिस्ट 3, स्टाफ नर्स, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 3, तर नर्ससाठी 84 कर्मचार्‍यांची पदे भरली जाणार आहेत. महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 10 लाखांपर्यंत पोहचल्यामुळे नागरी आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांची संख्या अधिक असते, मात्र कर्मचारीसंख्या कमी असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नव्या भरतीनंतर अपुर्‍या कर्मचार्‍यांची तक्रार बंद होऊन नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देता येईल, असा विश्वास महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी व्यक्त केला आहे.

सरकारी पगारात पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारीपदावर काम करण्यास उमेदवार मिळत नाहीत. महापालिकेत तीन पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकार्‍यांची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त वैद्यकीय अधिकार्‍यांनी भरती प्रक्रियेत सहभागी होऊन महापालिकेला पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळावेत यासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ

प्रयत्नशील आहेत.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply