Breaking News

धुळ्यात भाजपची मुसंडी

पालघर, नंदुरबार, वाशिम त्रिशंकू; नागपूर आघाडीकडे

मुंबई : प्रतिनिधी
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि. 8) लागला. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या धुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. नागपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला कौल मिळाला, तर पालघर, वाशिम, अकोला व नंदुरबार येथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
धुळे जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आली आहे. दोन पंचायत समित्यादेखील भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. भाजपने 51 पैकी सर्वाधिक 39 जागा जिंकून धुळे जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. काँग्रेस 7, शिवसेना 4, राष्ट्रवादी व इतर प्रत्येकी 3 असे अन्य कल आले. त्याचप्रमाणे शिरपूर व शिंदखेडा या दोन पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अनिल गोटे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादीने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्यामुळे तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर सोपवल्यामुळे या निवडणुकीत गोटे विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळाला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. यात भाजपने बाजी मारली.
भाजपचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, माजी पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्यासह नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी शिक्षणमंत्री अमरिश पटेल यांनी एकजुटीने धुळ्यात पक्षाचे वर्चस्व निर्माण केले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे यांचा कुसुंबा गटातून पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार संग्राम पाटील यांनी किरण शिंदे यांचा पराभव केला.
पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. एकूण 57 जागांपैकी शिवसेनेने 18, राष्ट्रवादी काँग्रेस 15, भाजप 10, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6, बहुजन विकास आघाडी 4, अपक्ष 3, तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेतही त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. एकूण 56 पैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी 23 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला सात, तर राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. येथे भाजपचा केवळ एक सदस्य होता. आता भाजपने 23 जागांवर झेप घेतली आहे.
पालघर, नंदुरबारबरोबरच वाशिम जिल्हा परिषदेतही मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. एकूण 52 जागांपैकी राष्ट्रवादी 12, काँग्रेस 9, शिवसेना 6, वंचित बहुजन आघाडीने 8, भाजप व जनविकास आघाडीने प्रत्येकी 7 जागांवर बाजी मारली आहे, तर अपक्ष 2 व स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 असे बलाबल झाले आहे.
नागपूरमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसने एकूण 58 जागांपैकी 30 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने 15, राष्ट्रवादीला 11, तर शिवसेना, अपक्ष व शेकाप यांच्या पदरी प्रत्येकी एक जागा आली आहे.
सदस्यसंख्येत भाजपची महाविकास आघाडीला मात
या सहा जिल्हा परिषदांमध्ये गेल्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये भाजपचे केवळ 53 सदस्य होते. ती संख्या आता 103 वर पोहोचली आहे. ही वाढ जवळपास दुप्पट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या यापूर्वी या सहा जिल्हा परिषदांत 148 जागा होत्या. त्या आता कमी होत 118 वर आल्या आहेत. एकूण 332 जागांपैकी भाजपला 103 जागा मिळाल्या. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र येऊनही भाजप या एका पक्षाने सदस्यसंख्येत महाविकास आघाडीला मात दिली आहे.
आदिवासी विकासमंत्री पाडवी यांना धक्का; पत्नी पराभूत
नंदुरबार : येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्य मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची पत्नी हेमलता पाडवी यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे राज्यात सहकारी बनलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराने पाडवी यांना पराभवाची धूळ चारली आहे.
नंदुरबारमधील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असलेल्या के. सी. पाडवी यांना त्यांच्या तोरणमाळ या बालेकिल्ल्यामध्येच हादरा बसला आहे. तोरणमाळ जिल्हा परिषद गटामध्ये पाडवी यांच्या पत्नी हेमलता यांचा पराभव झाला आहे. शिवसेना उमेदवार गणेश पराडगे यांनी हेमलता यांना मात दिली आहे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply