Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून महापौर सहाय्यता निधीस 25 लाखांची मदत सुपूर्द

पनवेल ः रामप्रहर वृत्त
दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून गोरगरीब, गरजूंना सढळ हस्ते मदत सातत्याने होत असते. त्याचबरोबर प्रत्येक संकटकाळात त्यांनी जनतेला मदतीचा हात देत आधार दिला आहे. त्याच अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महापौर सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपयांची मदत केली आहे.
महापूरासारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोरोना महामारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वसामान्यांचा विचार करून नेहमीच सर्वतोपरी मदत केली आणि मदतीची ही परंपरा आजही कायम आहे. या परंपरेला अनुसरून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 25 लाखांचा धनादेश पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याकडे सोमवारी (दि. 10) सुपूर्द केला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय कारणांसाठी तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणास्तव पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकसहभागातून महापौर सहाय्यता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना कोविड-19, हृदयरोग, मेंदू संबंधित उपचार तसेच शस्त्रक्रिया, कॅन्सर संबंधित शस्त्रक्रिया, ल्युकेमिया, थॅलेसीमिया, क्षयरोग, अवयव प्रत्यारोपण, डायलिसिस, बोनमॅरो यांसारख्या गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना, अपघातामुळे मृत्यू किंवा कायमस्वरूपी दुखापत, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. महापौर सहाय्यता निधीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 25 लाख रुपयांची मदत करून दुर्बल घटकातील गरजूंना दिलासा देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत गोरगरिबांना अडचण येऊ नये यासाठी महापौर सहाय्यता निधी उपयोगी ठरणार आहे. त्या अनुषंगाने आपद्ग्रस्तांना मदत होण्याकरिता आपलाही खारीचा
वाटा असावा यासाठी निधी दिला आहे.
-लोकनेते रामशेठ ठाकूर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार -महापौर
गेल्या वर्षी महापौर सहाय्यता निधी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सर्वप्रथम सभागृह नेते परेश ठाकूर व भाजप, आरपीआयच्या नगरसेवकांनी यामध्ये मदतीचा निधी दिला. लोकसहभागातून जमा झालेला निधी नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय मदतीसाठी उपयुक्त आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 25 लाख रुपये महापौर सहाय्यता निधीला देऊन या ट्रस्टला मदत केली. त्याबद्दल मी महापालिकेच्या वतीने त्यांचे आभार मानते, असे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी म्हटले आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply