सिडनी : वृत्तसंस्था
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 14 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अॅरोन फिंच याच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख खेळाडू मार्नस लाबूशेन याने भारतात भारताविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असल्याचे म्हटले असतानाच आस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघाचा कर्णधार फिंचने मात्र भारताला भारतात सहज पराभूत करू, असे म्हटले आहे.
फिंच म्हणाला की, भारतात भारतीय संघाविरुद्ध खेळताना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो, पण आम्ही नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. त्यामुळे आमच्या संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर कशा पद्धतीने कसा खेळ करायचा याचा आमच्याकडे प्लॅन तयार आहे. त्यामुळे आम्ही दडपणाखाली नाही.
तो पुढे म्हणाला, भारतीय उपखंडात खेळताना मोठी समस्या अशी असते की तुमच्या बनवलेल्या योजनांवर तुम्हीच शंका घेता. कारण उपखंडात जेव्हा यजमान संघ चांगल्या लयीत येतो तेव्हा तो समोरच्या संघावर चांगलाच दबाव टाकतो. भारत असो किंवा पाकिस्तान, श्रीलंका ते चांगल्या लयीत असल्यावर प्रतिस्पर्धी संघाला सहज धूळ चारतात.
भारतीय संघाविरुद्ध भारतात खेळण्यासाठी आम्ही काही योजना आखल्या आहेत. आमच्या संघाकडे भारताला पराभूत करण्यासाठी प्रतिभावंत खेळाडू आहेत. भारताला पराभवाचे पाणी पाजण्यासाठी तेवढे पुरेसे आहे आणि आम्ही त्या योजना अमलात आणू शकू याचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आम्ही टीम इंडियाला सहज धूळ चारू, असे फिंचने नमूद केले.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …