कर्जत : बातमीदार
तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ रेल्वे फाटक ते साई मंदिर परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होणे बाकी आहे. खडीकरण आणि त्यावर टाकण्यात आलेली माती यामुळे या रस्त्यावरून वाहने जाताना मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून वाहन चालकांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत.
माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण आणि काही भागात सिमेंट काँक्रीटीकरण ही कामे मंजूर होती. या रस्त्यापैकी 500 मीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण केले आहे. त्यासाठी या रस्त्यावर मातीचा भराव करून खडीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर निर्माण नगरी ते पाडा गेट या 300 मीटर भागात डांबरीकरण करण्यात आले होते. उर्वरीत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार होते. मात्र गेले दोन महिने सार्वजनिक बांधकाम खात्याने सिमेंट काँक्रीटकरणाचे काम सुरू केले नाही. त्यामुळे तेथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या इमारती आणि दुकानांसमोर धूळ आणि मातीचे थर निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून वाहने वेगाने जात असताना उडणार्या धुळीमुळे या भागातील रहिवाशांना श्वसनाचे आजार जडले आहेत. वाहनचालकही धुळीच्या त्रासाने हैराण झाले आहेत. यांच्याकडून रस्त्याच्या काँक्रीटकरणाच्या कामाची मागणी होत आहे.
कळंब-नेरळ या रस्त्याचे काम करणारी एजन्सी काम करीत नसल्याने आम्ही स्थानिक ठेकेदाराला नेरळ पाडा गेट ते साई मंदिर भागातील रस्त्याचे काम करायला सांगितले होते. मे महिन्यापूर्वी 200 मीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण केले जाईल आणि सर्वांची गैरसोय दूर केली जाईल.
-अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत
मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रारी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने 2020 च्या अखेरीस या रस्त्याचे काम सुरू केले. पण आता पुन्हा सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम रखडले आहे, ते लवकर सुरू करावे.
-विजय हजारे, सामाजिक कार्यकर्ते
रस्त्यावर उडणार्या धुळीने आम्ही रहिवासी त्रस्त असून दररोज साफसफाई करून आम्ही थकलो आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाने आमच्यासारख्या अनेक गृहनिर्माण संस्था आणि स्थानिकांचा अंत न पहाता आणि या रस्त्याचे काम त्वरीत करावे.
-संतोष जामघरे, रहिवासी, युवराज रेसिडेन्सी, नेरळ