कर्जत : बातमीदार
पोलीस दलाकडून सध्या रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहानिमित्त नेरळ पोलिसांकडून गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणारे ब्लँकेट ही त्यांच्यासाठी मायेची ऊब आणि पोलीस दलाविषयी आदर निर्माण करणारी आहे, असे मत पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी व्यक्त केले.
रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना नेरळ पोलीस दलाकडून हत्यारांची हाताळणी आणि पोलिसांच्या कामाची माहिती देण्याचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत. कर्जत तालुक्याती माणगाववाडी येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर बोलत होते. त्यावेळी त्यांनी नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांच्या पोलीस काका,पोलीस दीदी आणि शाळांमध्ये लावलेल्या पत्रपेटी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना ब्लँकेट करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव गायकवाड यांनीही पोलिसांचे कौतुक केले.
नेरळ पोलीस ठाण्याकडून नेरळ विद्या मंदिर शाळेतील 900 विद्यार्थ्यांना रेझिंग डे निमित्त पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. त्यात शस्त्र कशी असतात, शस्त्रांची हाताळणी कशी करावी याबरोबर पोलीस दल कायदा आणि सुव्यवस्था राखताना कशी कामगिरी बजावते यावर पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी नेरळ विद्या मंदिर मधील गरीब मुलांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. नेरळमधील कन्या शाळा, विद्या विकास शाळा येथील विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात जावून तेथील कामकाज पाहिले आणि पोलिसांशी संवाद साधला.