Breaking News

एसटी कर्मचार्यांची पगार कपात? कर्मचारी-अधिकारीवर्गात घबराट

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूड एसटी आगारातील कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने कर्मचार्‍यांत संभ्रमाचे

वातावरण निर्माण झाले आहे.  मुरूड आगारातील एसटी कर्मचार्‍यांना डिसेंबरचा पगार जानेवारीत त्यांच्या खात्यात जमा झाल्यावर एकूण पगाराच्या 70 टक्के पगारच जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे.  30 टक्के पगार हा आगार तोट्यात असल्याचे कारण देत कमी केल्याचे वृत्त आहे.

याबाबत मुरूड आगारात दबक्या आवाजात चर्चा असून सदरची सत्य परिस्थिती कामगारवर्ग कोणासही सांगण्यास तयार नाही. एसटी कर्मचारीवृंदामध्ये चालक, वाहक, तांत्रिक विभाग, लेखनिक व अधिकारीवर्गाचा समावेश आहे. मुळातच एसटी कर्मचारीवृंदाला सर्वांत कमी पगार मिळत असतानाही त्यातून 30 टक्के पगाराची रक्कम कपात झाल्याने ते मेताकुटीला आले आहेत. रायगडात आठ आगार असून तेथील कर्मचारीवृंदाचाही 30 टक्के पगार कपात केला आहे. अचानकपणे एसटी प्रशासनाने पगार कपात करण्याचे धोरण अवलंबल्यामुळे कर्मचारीवृंद भयभीत झाला आहे.

मुरूड आगारात एसटीच्या 56 फेर्‍या सुरू असून, महिन्याला एक कोटी 35 लाख जमा होतात. कर्मचारी पगारावर 36-40 लाख रुपये खर्च होतात. त्यामुळे सध्यातरी मुरूड आगार नफ्यात आहे. मुंबई, बोरिवली, धुळे, पुणे, ठाणे व औरंगाबाद फेर्‍यांतून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळते. त्यामुळे आगार नफ्यात असतानाही पगार कपात का, असा सवाल कर्मचार्‍यांना पडला आहे. गेली अनेक वर्षे एसटी कर्मचारीवृंदाचा पगार त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे, परंतु यंदाच्या या नव्या वर्षात डिसेंबर महिन्याचा पगार 30 टक्क्यांनी कमी केल्याने नवीन पद्धत सुरू होणार की काय यामुळे कर्मचारीवृंद चिंतेत पडलेला दिसून येत आहे.

70 टक्के पगार जमा झालेत हे सत्य आहे, परंतु यामागचे कारण मुळातच पगार वाटपाची रक्कम कमी आल्याने सध्या आम्ही कर्मचारीवृंदाला 70 टक्के पगार अदा केले आहेत. उर्वरित 30 टक्के रक्कम 15 जानेवारीला प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

-अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रायगड जिल्हा

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply