पनवेल : प्रतिनिधी
महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 ग्रामपंचायतीमधील कर्मचार्यांना महापालिकेत समाविष्ट न केल्याने सोमवारी (दि. 13) कर्मचार्यांनी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सोमवारी आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांची भेट घेऊन त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास सचिवांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 मध्ये स्थापन करण्यात आली. महापालिकेत पनवेल नगरपरिषद व 29 गावातील 23 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला. या वेळी नगरपरिषदेचा कर्मचार्यांचा समावेश करण्यात आला. 23 ग्रामपंचायतीमधील 384 कर्मचार्यांपैकी 320 कर्मचार्यांना शासन गठित समावेशनात पत्र ठरवले. त्यांचे प्रकरण तीन वर्षे शासनस्तरावर प्रलंबित आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी याबाबत तत्कालीन नगरविकास मंत्र्यांकडे याबाबत बैठक घेतली होती. तसेच विधानसभेत प्रश्न विचारून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले. त्याचकाळात निवडणूक झाल्याने आणि नवीन सरकार अस्तित्वात आले त्यामुळे हा प्रश्न नगरविकास सचिवांकडे प्रलंबित राहिला आहे. 22 जानेवारीपर्यंत प्रश्न न सुटल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा म्युनिसिपल एमप्लाईज युनियनने दिला आहे. उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, नगरसेवक नितिन पाटील, मनोहर म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, विद्या गायकवाड यांनी भेट दिली.