पेण : प्रतिनिधी
डाएट – पनवेल आणि पंचायत समिती शिक्षण विभाग – पेण यांच्या संयुक्त विद्यामाने मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समग्र प्रगतीसाठी पेणमध्ये निष्ठा प्रशिक्षण सुरू असून आत्तापर्यंत प्रत्येकी पाच दिवसांचे दोन टप्पे संपन्न झाले आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (महाराष्ट्र) आणि एनसीईआरटी (दिल्ली) यांच्यामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचे आणखी दोन टप्पे बाकी असून त्यामधून तालुक्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका व शासकीय आश्रमशाळांतील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे शंभर टक्के प्रशिक्षण होणार आहे, अशी माहिती प्रशिक्षण प्रमुख ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा. डॉ. संजय वाघ
यांनी दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे नेतृत्व, अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती, विद्यार्थी केंद्रित अध्यापनशास्त्र, सर्वसमावेशक शिक्षण, शाळा पातळीवरील मूल्यमापन, कला व माहिती संप्रेशण एकात्मिक शिक्षण, पर्यावरण, भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांचे अध्यापनशास्त्र व अध्यापन पद्धती आणि पोक्सो कायदा या घटक संचांवर मार्गदर्शन केले जात आहे. निष्ठाच्या माध्यमातून सर्व विषयांचे एकात्मिक स्वरूपात 100 टक्के शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
निष्ठा प्रशिक्षणासाठी मोहन भोईर (पेण), मनिषा खैरे ( डाएट, पनवेल), उमेश पाटील (उरण), अनिता काटले (उरण) व कृष्णा सावंत (पेण), हे काम पाहत आहेत. पेण पंचायत समितीचे निलेश मानकवळे प्रशिक्षण समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.