कर्जत : बातमीदार
तालुक्यातील पहिली सीबीएसई शाळा उभी राहिली आहे, या शाळेच्या माध्यमातून मातृभूमी आणि पालकांना सन्मान देणारी शाळा निर्माण करण्याचे आव्हान संस्थेसमोर असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी नेरळ येथे केले.
हुमारा फाउंडेशन आणि राधे फाउंडेशन यांनी नेरळ येथे शार्वील सीबीएसई शाळा सुरू केली असून, या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकताच उत्साहात संपन्न झाले. त्यात संदीप माने बोलत होते.
कर्जत तालुक्याचा परिसर लक्षात घेता या शाळेला ग्रामीण टच आहे. या ग्रामीण भागात सीबीएसई बोर्डाची शाळा उघडण्याचे धाडस मुजाहिद खोत आणि माधव तिवाटणे यांनी केले आहे. शार्वील शाळेने नंबर मिळविणारा विद्यार्थी नाही, तर माणूस बनविण्याचे स्वीकारलेले आव्हान आमच्या मनाला समाधान मिळवून देणारे ठरले, असे माने यांनी यावेळी स्पष्ट केले.कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या शार्वील शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी रायगड जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळचे सरपंच रावजी शिंगवा, कर्जत पं.स.चे माजी सभापती अमर मिसाळ, नेरळचे प्रभारी पोलीस अधिकारी अविनाश पाटील, संस्थेचे अध्यक्ष मुजाहिद खोत, विश्वस्त खोत, नासिर पटेल, वैशाली पाटील, उत्तरा वैद्य, मुख्याध्यापिका आशा ठोंबरे तसेच आयुब तांबोळी, जयेद नजे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper