शिष्टमंडळाचे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना साकडे
पेण ः प्रतिनिधी
प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमूर्तींवरील बंदी उठवावी, अशी मागणी भाजप नेते आणि पेणमधील गणेशमूर्तिकारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची दिल्लीत भेट घेऊन केली आहे.
या शिष्टमंडळात उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह गणेशमूर्तिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अभय म्हात्रे, सचिव प्रवीण बांधणकर, हमरापूर विभाग संघटनेचे अध्यक्ष गोपीनाथ मोकल, सचिव राजन पाटील, खजिनदार रोशन नाईक, सदस्य जयेश पाटील, बल्लाळ पाटील, कैलास पाटील, सचिन पाटील, भगवान पाटील, कुणाल पाटील, रवी मोकल, संतोष मोकल, रूपेश पाटील, अरविंद पाटील, अमोल कुंभार, कैलाश पाटील आदी कारखानदारांचा समावेश होता.
रायगड जिल्ह्यातील सात ते दहा हजार आणि महाराष्ट्रातील 10 ते 15 लाख लोक मूर्ती उद्योगावर अवलंबून आहेत. पीओपीच्या गणेशमूर्तींमुळे पर्यावरणावर कोणताही परिणाम होत नसल्याचा निष्कर्ष समितीने नेमलेल्या शास्त्रज्ञांनी काढला आहे. त्यामुळे पीओपी मूर्तींवर बंदी आणू नये, असे साकडे मूर्तिकारांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांना घातले. मूर्तींना देण्यात येणार्या रंगामुळे प्रदूषण होते असे पर्यावरण खात्याचे म्हणणे आहे. तसे असेल तर पर्यावरण खाते सांगेल ते रंग वापरण्यास मूर्ती कारखानदार तयार आहेत, असेही कारागिरांनी या वेळी सांगितले. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन पर्यावरणमंत्री यादव यांनी दिले.