Breaking News

वंजारपाड्यात आठवड्यातून एकदा पाणी; नळ योजना कुचकामी; विहिरीवर उसळतेय महिलांची गर्दी

कर्जत : बातमीदार

 तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा आणि शेंडेवाडी येथील नळपाणी योजना अल्पावधीत कुचकामी ठरली आहे. या योजनेतून आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्याने महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी विहिरीवर रात्रीपर्यंत थांबून राहावे लागत आहे. दरम्यान, या योजनेच्या दुरुस्तीचे काम सतत सुरू राहत असल्याने ग्रामस्थांनी या नळपाणी योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

वंजारपाडा आणि शेंडेवाडी ग्रामस्थांसाठी 2012मध्ये नळपाणी योजना बनविण्यात आली. वंजारपाडा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हास नदीवर ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना समितीने ग्रामस्थांना घरोघरी नळ दिले, पण त्या नळाला सध्या आठवड्यातून एकदाच पाणी येत आहे. त्यामुळे वंजारपाडा आणि आदिवासीवाडीमधील दोन हजारांहून अधिक ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

वंजारपाडा नळपाणी योजनेतील जलवाहिन्या प्लास्टिकच्या असल्याने त्या सतत फुटत असतात. या योजनेतील विजेचा पंप चोरीला जाण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. शिवाय विजेचे बिल थकीत आहे. त्यामुळेदेखील गावात पाणी सोडले जात नाही, असे सांगण्यात येते.

नळपाणी योजना वारंवार बंद पडत असल्याने वंजारपाडा गावातील महिलांना एकमेव विहिरीवर पाण्यासाठी नंबर लावून बसावे लागते. कधी कधी रात्रीपर्यंत नंबर लावून राहावे लागते. ही विहीर गावाच्या एका बाजूला असल्याने महिलांना मोठे अंतर पार करून

जावे लागते. पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन पाठवले आहे. त्यात वंजारपाडा नळपाणी पुरवठा योजनेत निकृष्ट दर्जाची पाइपलाइन टाकण्यात आल्याने ती सतत फुटत असून, या योजनेतील सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर दामिनी विरले, पुष्पा विरले, मनू धुळे, सुलभा तरे, सुरेखा मिसाळ, अरुणा ठमके, रोहिणी माळी, भाग्यश्री बाबरे, बेबी आगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिलांच्या सह्या आहेत.

जलवाहिन्या फुटत असल्याने गावात मागील काही दिवस दररोज पाणी सोडले जात नाही. या योजनेतील दुरुस्तीची कामे करण्यासाठी पाणी पुरवठा समितीकडे पुरेसा निधी नाही, मात्र महिलांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही दुरुस्तीची कामे सुरू केली असून, दोन दिवसांत नळाला नियमित पाणी येईल. -बाबूराव माळी, अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती, वंजारपाडा, ता. कर्जत

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply