महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतदेखील आघाडी करूनच निवडणुका लढवायच्या असे ठरले आहे. रायगड जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीत एकवाक्यता होत नाही. शिवसेनेला डावललं जातंय म्हणून शिवसेना नाराज आहे.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले याचा आनंद शिवसैनिकांना झाला. शिवसेनेचे रायगडात तीन आमदार निवडून आल्याने मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु मंत्रिपद काही मिळाले नाही. मंत्रिपद नाही किमान रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळेल, अशी आशा होती. तेही मिळाले नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची वर्णी लागल्यामुळे रायगड जिल्ह्यात महाआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील धुसफूस प्रकर्षाने समोर आली आहे. सत्ताधारी पक्षात असूनही सत्तेत वाटा मिळत नाही अशी अवस्था रायगडमधील शिवसैनिकांची झाली आहे. नाराजी व्यक्त केली तरी पक्ष दखल घेत नाही. रायगड जिल्ह्यात शिवसेनेची गोची झाली आहे.
राज्यात महाआघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर राज्यातही हाच आघाडीचा फॉर्म्युला राबविण्याचा निर्णय शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने घेतला होता. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये तसे प्रयोग करण्यात आले. रायगड जिल्ह्यात मात्र महाआघाडीत बिघाडी आहे. रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी करून जिल्हा परिषद अध्यक्षपद शिवसेनेला मिळावे यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्यासमवेत जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी बोलणीही केली होती, मात्र निवडणूकपूर्व आघाडी असल्याचे कारण देऊन शेकापची साथ सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिला. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 18, राष्ट्रवादीचे 11 आणि काँग्रेसचे तीन सदस्य आहेत. हे तीन पक्ष एकत्र आले असते तर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणे सहज शक्य होते, मात्र राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे शिवसेनेची जिल्हा परिषदेत कोंडी झाली. जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या 18 जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून शिवसेनेने अध्यक्षपदाची निवडणूक लढवली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत महाआघाडी तूर्तास होणार नाही हे स्पष्ट झाले. शेकापच्या योगिता पारधी यांची अध्यक्षपदी आणि राष्ट्रवादीच्या सुभाष घारे यांची उपाध्यक्षपदावर बिनविरोध वर्णी लागली. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली, पण इथेही शिवसेनेच्या हाती फारसे काही पडत नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिवसेना सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. परिणामी जिल्हा परिषदेत महाआघाडीचे दरवाजे आपोआप बंद झाले. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत असतानादेखील रायगडात शिवसेनेच्या वाट्याला अद्याप सत्तेची पदे आली नाहीत.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने रायगड जिल्ह्याला स्थान दिले नाही. सलग तीन वेळा निवडून येणार्या भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. उलट राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे शिवसेनेत नाराजी होती. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद तरी शिवसेनेकडे राहावे यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विनंती करण्यात आली. शेवटच्या क्षणी आदिती यांच्याकडेच रायगडचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले. त्यामुळे ही नाराजी अधिकच वाढली आहे. जिल्ह्यात तीन आमदार असताना पक्षाला सत्तेचे कोणतेच पद मिळाले नाही. रायगडातील नाही तरी इतर जिल्ह्यातील शिवसेनेचा मंत्री रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री झाला असता, तर किमान काही विकासकामे करून घेता आली असती. आता जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आहेत. त्यांच्याकडून शिवसेनेचे खच्चीकरण सुरूच राहील, अशी धास्ती सेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना आहे.
तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे मंत्रिपद देताना अडचणी होत्या, पण पालकमंत्रिपदाबाबत तडजोड करण्याचा प्रश्नच नाही. ज्या पक्षाचे जास्त आमदार ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यात त्या पक्षाचा पालकमंत्री असावा असे ठरले होते. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. तरीदेखील शिवसेनेच्या वाट्याला ना मंत्रिपद, ना पालकमंत्रिपद. त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. ‘पालकमंत्री हटाव, शिवसेना बचाव’चा नारा सेना पदाधिकार्यांनी दिला आहे. आपल्या पदांचे राजीनामे देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे, परंतु त्याची दखल घेतली गेली जाईल अशी चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. पालकमंत्री बदलणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे किती गांभीर्याने घेतात यावर सारे अवलंबून आहे.
शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे मांडणे काही गैर नाही. हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, पण पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे या महाआघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन काम करतील, असे राष्ट्रवादीचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. त्यावर रायगडातील शिवसैनिकांचा विश्वास नाही. आपण सुचविलेली कामे होतीलच असे शिवसैनिकांना वाटत नाही, परंतु महाविकास आघाडीत असल्याने गप्प बसावे लागते. आघाडीतील मोठा पक्ष असूनही, तसेच जिल्ह्यात सर्वाधिक आमदार निवडून आलेले असताना शिवसेनेला रायगडात आता राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जावे लागेल. शिवसैनिकांची हीच खंत आहे. -प्रकाश सोनवडेकर, अलिबाग