नवी मुंबई : बातमीदार
लोकनेते दि.बा. पाटील यांचा 94वा जयंती सोहळा सोमवारी (दि. 13) मोठ्या उत्साहात झाला. भूमिपुत्रांपुधील उद्योजकतेच्या संधी या चर्चा सत्राचे आयोजन आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर येथे करण्यात आले होते.
मुंबई व्यतिरिक्त वसई, मीरा-भाईंदर, घोडबंदर रोड, ठाणे, बाळकुम, कोलशेत, भिवंडी, दिवा-डोंबिवली परिसर, तळोजा, पनवेल, उरण, विमानतळ बाधित क्षेत्र येथून आलेल्या शेकडो संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेळी विक्टरी कॉन्सेप्टस आणि ब्रान्डिंग बॉक्सचे संचालक तसेच आखिल भारतीय मच्छिमार संघटनेच्या उद्योग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख असलेले विकास कोळी, तसेच उच्च विद्याविभूषित सागर पाटील, साई समर्थ ग्रुपचे संचालक असणारे एक युवा उद्योजक सुशांत पाटील हे सदर चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. भौगोलिक प्रदेशाला त्यातील उद्योजकतेच्या संधींना दृष्टीक्षेपात ठेवून चर्चासत्र झाले. तिन्ही वक्त्यांकडून भूमिपुत्रांसाठी पारंपारिक व्यवसायांना आणि उद्योगांना आधुनिकतेची कशी जोड लागू शकते, स्टार्ट अप म्हणजे काय ते कसे काम करते, नेटवर्किंग मधून कशा पद्धतीने संधी निर्माण होऊ शकतात, शासकीय योजना आणि नियमांचा वापर उद्योगांसाठी कसा करता येऊ शकतो. चार जिल्ह्यांमध्ये असलेली भूमिपुत्रांची स्वतःची लोकसंख्या स्वतः एक मार्केट आहे, जी अजून नव्या संधी निर्माण करू शकते, अशा अनेक विषयांवर ह्यावेळी उहापोह करण्यात आला. या वेळी एक यशस्वी उद्योजिका खेकड्यांचे एक्सपोर्टर गुणाबाई सुतार ह्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या परिवारातील महीला टीम मेम्बर्सनी सुरु केलेल्या आगरी-कोळी मसाले ह्या गृहउद्योग उपक्रमाला दोन वर्ष यशस्वीरीत्य पूर्ण केल्याबद्दल टीमचा विशेष सन्मान करण्यात आला.