मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी परीसरातील आपटा कोळी बांधवांकडून पाताळगंगा आपटा नदीपात्रात होड्यांच्या शर्यती झाल्या. या स्पर्धेत चार होड्या सहभागी झाल्या होत्या. ही शर्यत श्री गणपती मंदिर ते श्री बापुजी मंदिर यानंतर पुन्हा श्री गणपती मंदिर अशी झाली.
या होड्यांच्या शर्यतीत पहिला क्रमांक जगन पाटील ग्रुपने पटकाविला, तर दुसरा क्रमांक पदा घासे ग्रुपने पटकाविला. तसेच या वेळी पाताळगंगा नदीच्या आपटा पात्रात पोहण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोहण्याच्या या स्पर्धेत बंटी सावंत याने पहिला क्रमांक मिळविला, तर प्रेम भोईर हा दुसरा आला.
होडी शर्यत आणि पोहण्याच्या शर्यतीतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात आले. पाताळगंगेच्या आपटा नदीपात्रात या शर्यती दोन तास सुरू होत्या. या कार्यक्रमाला मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष शंकर भोपी, उपाध्यक्ष यशवंत भोईर, आजी माजी पंच कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपटा कोळी समाजाचे गणेश भोईर व नरेश शेलार यांनी मेहनत घेतली.