किरीट सोमय्या यांची माहिती
कल्याण ः प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राइट हॅण्ड असलेले शिवसेनेचे घोटाळेबाज नेते प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटींची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. घोटाळा केलेली 100 कोटींची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य मालमत्ताही ईडी जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
टिटवाळा गुरुवली येथील जमिनीच्या ठिकाणी भाजप नेते सोमय्या यांनी रविवारी (दि. 10) प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, शक्तीवान भोईर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. एनईसीएलच्या 100 कोटींच्या घोटाळ्याच्या रकमेतून सरनाईक यांनी टिटवाळा गुरुवली येथे 78 एकर जमीन विकत घेतली होती. ही जमीन ईडीने जप्त करण्याची नोटीस 2014 सालीच काढली होती. आता ही जमीन जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे. त्याची नोटीसच सोमय्या यांनी माध्यमांना सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राइट हॅण्ड असलेल्या घोटाळेबाज सरनाईकांविरोधात आता ठाकरे सरकार काय कारवाई करणार, असा खडा सवाल सोमय्या यांनी या वेळी उपस्थित केला आाहे. 13 हजार गुतंवणूकदारांचे 560 कोटी रुपये सरनाईक यांनी गायब केले आहेत. घोटाळ्याशी सरनाईक यांचा थेट संबंध आहे. 100 कोटी रुपये सरनाईक यांनी परत न केल्यास ईडी सरनाईक यांच्या अन्य मालमत्ताही जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
दरम्यान, कल्याण-टिटवाळा येथील गुरवली येथे येण्यासाठी मुंबईहून निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना टिटवाळा रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यांची गाडी वाहतूक कोंडीत फसली. अखेर स्वत: सोमय्या यांनी गाडीतून उतरून वाहतूक कोंडी दूर केली. ठाकरे सरकार रस्ता रुंदीकरणाचे नाटक करीत आहे. ठाकरे सरकारच्या राज्यात राज्याच्या प्रगतीची गती थांबली आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत जनता ठाकरे सरकारला धडा शिकविणार आहे, अशी टीकाही सोमय्या यांनी केली आहे.
‘आमच्यापेक्षा जनतेची सुरक्षा महत्त्वाची’
सरनाईक यांचा तिसरा घोटाळा मी बाहेर काढला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार घाबरले आहे. एकामागोमाग घोटाळे बाहेर पडत आहेत. औरंगजेबाचा जयजयकार करणार्या ठाकरे सरकारने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतली आहे, मात्र विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. आमच्या सुरक्षेपेक्षा जनतेची सुरक्षा महत्त्वाची आहे, असेही सोमय्या यांनी या वेळी सुनावले आहे.